‘बायकांनी कुंकवाच्या बोटाला आणि पुरुषांनी चहाच्या घोटाला नाही म्हणू नये.’ अशी आपल्याकडे म्हण आहे. बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे चहा. अशा वेळी वाफाळत्या चहाचा आस्वाद घेणं ही सुखाची परमावधी आहे.
लहानथोर, गरीब श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे. काही ठिकाणी उल्लेख केल्यानुसार चहा तृषाशामक- तहान भागवणारा, झोप घालवणारा, मेंदूला उत्तेजित करणारा, मेंदू, मूत्राशय, घसा आणि छातीच्या विकारांवर उपयुक्त असल्याचा उल्लेख आहे. पण याशिवाय त्याचे इतर अनेक रंजक पैलू आहेत. बघा तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का...




















