स्मार्टफोन्स आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा झाले आहेत. दहा पंधरा वर्षांपूर्वी लोक सोबत एफ एम रेडिओ घेऊन फिरायचे, गावाला जाताना सोबत कोडॅकचा कॅमेरा सोबत बाळगावा लागयाचा, टॉर्चपण कधीकधी लागायचा. पण आज हे सगळं आपल्या 'मुठ्ठी'मध्ये सामावलंय. गाणी ऐकणं, व्हिडीओ बघणं, नकाशामध्ये पत्ता शोधणं आणि अर्थातच मेसेज व कॉल करणं या सगळ्या गोष्टी मोबाईलशिवाय कशा होणार? आपण या मोबाईलवर इतके अवलंबून आहोत की पूर्वी मित्रमंडळींनी कुठं भेटायचं ठरवलं असेल तर ते लोक विनामोबाईल कसे भेटत असतील हा प्रश्नच पडतो नाही? रोज मोबाईल वापरताना मात्र आपण आपली अत्यंत वैयक्तिक माहितीसुध्दा आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करतो. फॅमिली फोटो तर असतातच, पण महत्वाचे इमेल्स, फेसबुक व्हाट्सॲपवरच्या चॅट्स.. काही महान लोक तर त्यात एटीम आणि क्रेडिट कार्डाचे पिन नंबर आणि इमेल्सचे पासवर्ड्स पण सेव्ह करतात. आता बोला!!
पण… समजा हा असा अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर???
मंडळी, पैशांच्या नुकसानीपेक्षा आपला डेटा दुसऱ्यांच्या हाती पडणे हे जास्त धोक्याचं असतं. चला तर मग पाहूया चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन कसा शोधायचा…








