सर्व ऋतूंमध्ये हिवाळा फार मस्त असतो. पहाटे पडणारे थंडी, लहान झालेले दिवस, मोठ्या झालेल्या रात्री आपल्याला या ऋतुची चाहूल देतात. हिवाळ्यात भूक चांगली लागते व खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होते, म्हणून शरीराला ऊर्जा भरपूर प्राप्त होते. ह्या ऋतूत भाज्या आणि फळे यांचीही अगदी रेलचेल असते. सर्व भाज्या एकदम रंगतदार आणि चविष्ट असतात. चंदन बटवा, चाकवत, मटार, गाजर अशा भाज्या, ओले अंजीर, सीताफळ, पेरु यांसारखी फळे फक्त याच ऋतूत मिळतात. सध्या अवकाळी पावसामुळे भाज्या आणि फळांचे दर कडाडलेले असले तरीही भाजी घेण्याचा मोह काही आवरत नाही.
हल्ली अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतात. तिथे भाज्या एकदम ताज्या आणि गावठी वाणाच्या असतात. अशा ठिकाणाहून आणि नसेल तर तुमच्या नेहमीच्या मंडईतून ताजा करकरीत फ्लाॅवर, लाल रसरशीत गाजरं, हिरवेगार मटार, चटकदार आवळे, ओली हळद, आलं आणि लिंबं घेऊन या. आणि मस्त चटकदार लोणची बनवा. कशी बनवायची? आम्ही आहोत ना तुम्हांला पाककृती द्यायला..









