चक्क आकाशातूनही दिसणारे ४००० वर्षे जुने वाळवीचे महानगर!!

लिस्टिकल
चक्क आकाशातूनही दिसणारे ४००० वर्षे जुने वाळवीचे महानगर!!

मंडळी, फोटोत दिसणारी लहानशी टेकडी ही टेकडी नसून वाळवींचं एक भलंमोठं साम्राज्य आहे. तब्बल ४००० वर्षापूर्वी वाळवीने अशा प्रकारची वारुळे बांधायला सुरुवात केली. राव, तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच सुमारास इजिप्तचे प्रसिद्ध पिरॅमिड बांधले जात होते. इजिप्शियन साम्राज्य नष्ट झालं पण वाळवीने तयार केलेलं हे साम्राज्य आजही भक्कम उभं आहे. चला तर जाणून घेऊया या वाळवीच्या या साम्राज्याबद्दल.

मंडळी, ही भलीमोठी वारुळे ब्राझील मध्ये आढळून आली आहेत. खरं तर ही वारुळे सुद्धा नाहीत. हा एक मातीचा ढीग आहे. या मातीच्या ढिगाखाली वाळवीने तयार केलेल्या असंख्य बिळांचं जाळं पसरलं आहे. हे जाळं तयार करत असताना जी माती बाहेर फेकली गेली ती माती म्हणजे हा मातीचा ढिगारा.

आपल्याला या ज्या लहानलहान टेकड्या दिसत आहेत त्या हजारो वर्षांच्या कालावधीत तयार झाल्या आहेत. ब्राझीलच्या उत्तरेतल्या काटिंगा जंगलात अशा प्रकारची तब्बल २० कोटी वारुळे आढळली आहेत. ज्या प्रमाणात ही माती बाहेर फेकली गेली त्यात गिझाचे ४००० पिरॅमिड्सच्या तयार झाले असते राव. शिवाय ज्या विस्तृत जमिनीवर ही वारुळे पसरली आहेत तेवढ्या जमिनीत आज ग्रेट ब्रिटन वसलं आहे.

मंडळी, याबद्दल सॅल्फोर्ड युनिव्हर्सिटीचे स्टीफन मार्टिन यांनी म्हटलंय की जमिनीवर पडलेली सुकलेली पाने जमिनीखालूनच सुरक्षितपणे खाता यावीत म्हणून वाळवीच्या एकाच एक प्रजातीने या प्रकारचं जाळं विणलं आहे. रॉय फुन्च नावाच्या ब्राझिलियन तज्ञाने याला ‘सर्वात व्यापक बायोइंजिनियरिंग’ म्हटलं आहे.

अनेक वर्षापर्यंत जंगलाच्या दुर्गम भागात ही वारुळे लपून होती. त्यांच्याबद्दल स्थानिकांनाही माहित नव्हतं. जेव्हा गुरांच्या चरणासाठी जमीन साफ करण्यात आली तेव्हा याकडे सगळ्याचं लक्ष गेलं. पहिल्यांदा केलेल्या मृदा परीक्षणात असं आढळलं की हे मातीचे ढिगारे तब्बल ६९० ते ३८२० वर्षांपूर्वी तयार झाले आहेत. याची तुलना आफ्रिकेच्या भागात आढळणाऱ्या उंचच उंच वारुळांशी केली गेली.  

मंडळी, वैज्ञानिकांनी केलेल्या परीक्षणात असं आढळून आलंय की वारुळे तयार करण्यात वाळवी या कीटक जमातीत स्पर्धा चालते. दोन वारुळे एकमेकांपासून हटकून लांबच्या ठिकाणी बांधण्यात आली आहेत. यात स्पर्धा तर दिसलीच पण त्यासोबतच वाळवी आक्रमक असते हेही परीक्षणातून सिद्ध झालंय. ही जुनी वारुळे एक प्रकारे वाळवीच्या एका एका समुदायाने तयार केलेले महाल आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मंडळी, जमिनीखाली एक प्रकारे वाळवीने महानगर वसवलं आहे. जसा प्रत्येक शहराचा नकाशा असतो तसा याचाही आहे. वाळवी ही ‘फेरोमॉन’ नावाचं रसायन सोडते. या रसायनाच्या आधारे तिच्या डोक्यात नकाशा छापला जातो. आपण कुठून आलो आहोत आणि कुठे चाललोय हे तिला लगेच समजतं. याच ‘फेरोमॉन’मुळे ती इतर कीटकांच्या संपर्कात राहते.

एकंदरीत वाळवीने आपल्या शहरांची रचना माणसांपेक्षा कैकपटीने चांगली केली आहे. त्यामुळेच तर तब्बल ४००० वर्ष हे साम्राज्य टिकून आहे.

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख