येमेन पासून समुद्रात २११ किलोमीटर दूर असलेल्या द्वीपसमूहांपैकी एक म्हणजे सोकोत्रा बेट. सोकोत्रा या द्वीपसमूहांमध्ये सर्वात मोठं बेट आहे. जवळजवळ ९५% जागा सोकोत्राने व्यापली आहे. सोकोत्रा बाकी जगापासून किती तुटलेला आहे हे पुढील उदाहरणावरून तुम्हाला दिसेल : सोकोत्रावर आढळणाऱ्या एक तृतियांश वनस्पती ह्या जगभरात कुठेही आढळत नाहीत !!
सोकोत्राला भेट दिलेल्या पर्यटकांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटलंय, “सोकोत्रा बेटावर जाणे म्हणजे जणू दुसऱ्या ग्रहावर जाण्यासारखे आहे.”
सोकोत्राला भेट देण्यासाठी समुद्र हा पहिला मार्ग आहे. पण हा मार्ग खडतर आहे राव. कारण येमेन भागात वर्षातून २ वेळा मान्सून येतो. त्यामुळे समुद्रावरून प्रवास करणे कठीण होते. यातूनही मार्ग निघू शकतो पण आणखी एक समस्या म्हणजे ‘समुद्री चाचे’. हे लुटारू कधी हल्ला करतील याचा नेम नाही.
आता दुसरा मार्ग उरला विमानाचा. सध्या येमेन भागात चाललेल्या यादवी युद्धामुळे ते जवळजवळ अशक्य झालेलं आहे. सर्व परिस्थिती निवळण्यासाठी आणखी काही वर्ष जातील.