१९२० साली ‘लोगो एपेकुयेन’ नामक खाऱ्या पाण्याच्या तलावाकाठी एला एपेकुयेन गाव वसवण्यात आलं होतं. हे गाव म्हणजे एक पर्यटनस्थळ होतं. गावाबद्दल सांगण्याआधी या तलावाबद्दल जाणून घेऊया. लोगो एपेकुयेनची खारेपणाची क्षमता मृत समुद्राच्या खालोखाल आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईलच की कोणत्याही समुद्रापेक्षा जास्त खारं पाणी या तलावात आहे.
१९२० साली स्थापना झाल्यानंतर १९७० पर्यंत या गावाची भरभराट झाली. जवळजवळ ५००० माणसं गावात होती. माणसांची रेलचेल, हॉटेल्स, स्पा, दुकाने, म्युझियम अशा सगळ्या गोष्टी इथं होत्या. पण अचानक निसर्गानं गावावर झडप घातली आणि या गावातलं सगळं नष्ट झालं.

स्रोत
१९८५ च्या सुमारास एला एपेकुयेन गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. प्रचंड पावसामुळे गावातलं धरण व बांध फुटला. हे कमी होतं म्हणून की काय म्हणून तलावाची पातळीसुद्धा वाढली. १९९३ पर्यंत या गावाला पाण्याने जवळजवळ गिळून टाकलं आणि गाव राहण्यासाठी अयोग्य ठरवण्यात आलं. तब्बल १६ वर्षांनी म्हणजे २००९ साली या गावावर असलेलं संकट कमी झालं. पण गेलेले नागरिक परतले नाहीत. पाब्लो नोवाक हे ८१ वर्षांचे आजोबा तेवढेच पुन्हा राहण्यासाठी आले. आज ते या भल्यामोठ्या गावाचे एकमेव नागरिक आहेत.