संकटे कधीच एकटी येत नाहीत. कधी कधी आपण एखाद्या प्रसंगातून बालंबाल बचावलो म्हणून सुटकेचा निश्वास सोडेपर्यंत दुसरे संकट अगदी दत्त म्हणून हजर असते. संकटांची अशी मालिका आपल्यापैकी प्रत्येकजण कधी न कधी अनुभवतोच. पण, अशावेळी आपल्याला धीर द्यायला आपली माणसं असतात. काही जण कृतीने किंवा काहीजण शब्दाने आधार देतात, धीर देतात. लोकांची आपल्याला मिळणारी ही साथच आपल्याला अशा कठीण प्रसंगातून तारून नेते.
पण, समजा तुम्ही तुमच्या कामानिमित्त कुठे बाहेरगावी किंवा बाहेरच्या देशात गेला आहात आणि तिथे अनोळखी ठिकाणी तुमच्यावर एखादे संकट कोसळले तर तुमची अवस्था काय होईल. एकतर अनोळखी प्रदेश त्यात अनोळखी लोक, अशा काळात कुणाला मदत मागणार आणि कोण आपल्याला मदतीचा हात पुढे करणार अशी कित्येक नकारात्मक विचारांचे तरंग आपल्याला आणखीन भांबावून सोडतात. अशा अनोळखी ठिकाणी आपल्याला मागे उभी राहते ती माणुसकी. असाच काहीसा प्रकार घडला आहे ब्रिटन मधील आयन जॉन्स सोबत, जो कामानिमित्त भारतात आला आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकून पडला.









