फसवणुकीची नवी स्कीम : जिओ टॉवरच्या नावावर भामटे कसे लुटत आहेत पाहा..

लिस्टिकल
फसवणुकीची नवी स्कीम : जिओ टॉवरच्या नावावर भामटे कसे लुटत आहेत पाहा..

मंडळी, पूर्वी एक मेसेज यायचा, की अमुक अमुक कंपनीचे मालक वारले आहते आणि त्यांची संपत्ती तुमच्या नावावर करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला तमुक तमुक पैसे भरावे लागतील. तेवढे पैसे भरले की सगळी मालमत्ता तुमच्या नावावर. मग ऐश करा !!

राव, याच प्रकारचा नवीन फसवेगिरीचा प्रकार सध्या उघड झाला आहे. पण हा प्रकार आजवरच्या कोणत्याही रॅकेट पेक्षा जास्त हुशारीने आणि योजनाबद्धरीतीने चालवला जातोय.

काय आहे हा घोटाळा ?

काय आहे हा घोटाळा ?

“मी रिलायन्स जिओ 4G टॉवर डिपार्टमेंटकडून बोलतोय. रिलायन्स जिओचं टॉवर उभारण्यासाठी तुमची जमीन निवडण्यात आली आहे”. इथून या फसवेगिरीला सुरुवात होते. लोकांना सांगितलं जातं की त्यांची जमीन भाड्याने घेतली जाईल, तिथे टॉवर उभारलं जाईल, त्याबदल्यात त्यांना प्रत्येक महिन्याला १५ ते ३५,००० रुपये दिले जातील. आगाऊ रक्कम म्हणून तुम्हाला १० ते २५ लाख रुपये पण दिले जातील. पण.....

राव, इथून पुढे खरी मेख आहे. लोकांना “प्रोसेसिंग फी” म्हणून १० ते ५०,००० पर्यंतची रक्कम भरण्यास सांगितलं जातं. पुढे काय होतं हे वेगळं सांगायला नको !!

या घोटाळ्याचं वेगळेपण काय आहे ?

या घोटाळ्याचं वेगळेपण काय आहे ?

मंडळी, आधीच सांगितल्याप्रमाणे हा रॅकेट आजवरच्या कोणत्याही रॅकेट पेक्षा जास्त हुशारीने आणि योजनाबद्धरीतीने चालवला जातोय. तुम्ही गुगलवर “Jio tower” असं सर्च केलं तर बोगस कंपन्यांची रांगच लागते. (यात बदल होऊ शकतो) या वेबसाइट्स अत्यंत हुशारीने तयार करण्यात आल्या आहेत. वेबसाईट मधील रिलायन्स जिओचा लोगो आणि इतर बारीकसारीक माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरण्यात आली आहे. उदाहरणादाखल ही वेबसाईट पाहा.

http://jiotowerindia.in/

अस्सल वेबसाईट वाटण्याइतकी ही वेबसाईट फसवी आहे. अशा वेबसाइट्समुळे भलेभले फसले नसते तरच नवल. याही पुढची पायरी आहे ती जिओच्या कन्फर्मेशन लेटरची. याचा एक नमुना तुम्ही खाली बघू शकता.

 

अशा प्रकारे सर्व अधिकृत भासवून जाळ्यात अडकवलं जातं.

WhatsApp आणि जिओ टॉवर घोटाळा :

WhatsApp आणि जिओ टॉवर घोटाळा :

मंडळी, हा संपूर्ण कारभार केवळ whatsapp द्वारे चालतो. फोन वरून संपर्क साधल्यानंतर लोकांकडून त्यांची कागदपत्रे मागितली जातात. कोणत्या पत्त्यावर पाठवायची विचारल्यावर एकच उत्तर येतं whatsapp only. यानंतर सांगितलं जातं की तुमच्या जमिनीची उपग्रहाद्वारे पाहणी करण्यात येईल. जमिनीची पाहणी आणि कागदपत्रे तपासण्यात आली की आम्ही तुम्हाला पुन्हा संपर्क करू असं सांगण्यात येतं. हा सगळा पुढचा संपर्कही केवळ whatsapp द्वारेच केला जातो.

हा घोटाळा उघड असूनही त्यावर निर्बंध का आणले जात नाहीत ?

हा घोटाळा उघड असूनही त्यावर निर्बंध का आणले जात नाहीत ?

याचं एकच उत्तर आहे, चोर हुशार आहेत. या रॅकेटचं जाळं वेगवेगळ्या शहरात पसरलंय. ज्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितलं जातं ते खातं जिओ किंवा रिलायन्सच्या नावावर नसून साध्या माणसांच्या नावावर असतं. ही माणसं देखील वेगवेगळ्या राज्यात आढळली आहेत. या दोन्ही व्यक्ती कधीही एकाच राज्यातून नसतात.

वेगवेगळ्या व्यक्तींच्या अकाऊंटवर हे पैसे जात असल्याने हा घोटाळा अगदीच लहानसहान चोरीचा होऊन बसतो. अशावेळी पोलीसही मनापासून लक्ष घालत नाहीत. यात भरीसभर म्हणजे ज्या मोबाईल क्रमांकावरून आपल्याला फोन आलेला असतो तो काही दिवसातच बंद होतो.

मंडळी, हा प्रकार एक दोन नव्हे तर असंख्य लोकांसोबत घडला आहे. एका व्यक्तीने आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटलंय, की त्यांच्याकडून सुरुवातीला १४,५०० रुपये मागण्यात आले. त्यांनी ती रक्कम भरल्यानंतर काही दिवसांनी त्यांना आणखी ५२,५०० रुपये मागण्यात आले. तोवर त्यांना हे लक्षात आलं होतं की आपण फसवले गेलो आहोत.

यावर खऱ्या जिओचं काय म्हणनं आहे ?

यावर खऱ्या जिओचं काय म्हणनं आहे ?

खऱ्याखुऱ्या जिओने याबद्दल एक परिपत्रक काढून हा एक फसवेगिरीचा प्रकार असल्याचं म्हटलंय. या प्रकारे फसवताना कोणी आढळला तर त्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलंय. ज्या वेबसाईट्सवरून हा प्रकार चालतो त्याही बंद करण्यात येतील असं म्हटलंय.

जिओने केलेल्या कारवाईचा परिणाम आता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर अशा भरमसाठ वेबसाईट्स दिसायच्या. आज त्यातल्या काही मोजक्या उरल्या आहेत.

अधिकृतपणे जिओला जमीन भाड्याने देता येते का ?

अधिकृतपणे जिओला जमीन भाड्याने देता येते का ?

उत्तर आहे – हो !!.... जिओचे अधिकृत पार्टनर आहेत इंडस-टॉवर्स. इंडस-टॉवर्स जिओचे टॉवर्स उभारण्याचं काम करतात. तुम्हाला जर टॉवरसठी तुमची जमीन भाड्याने द्यायची असेल तर तुम्ही अधिकृतरीत्या तुमची जमीन इंडस टॉवर्सच्या वेबसाईटवर रजिस्टर करू शकता. जर गरज पडली तर कंपनी तुम्हाला स्वतःहून संपर्क करेल.

 

तर मंडळी, तुम्हाला जर रातोरात मालामाल करणारी कोणती स्कीम आढळली तर फसू नका. जास्त पैसे कमावण्याच्या भानगडीत आहेत ते पैसेही जाऊ शकतात.

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख