६७ वर्षात एकदाही आंघोळ न केलेला जगातला सर्वात घाणेरडा माणूस जगतो तरी कसा?

लिस्टिकल
६७ वर्षात एकदाही आंघोळ न केलेला जगातला सर्वात घाणेरडा माणूस जगतो तरी कसा?

रोजरोज तीच ती कामं करण्याचा कंटाळा येतो ना? कधी कधी वाटतं या रुटीन कंटाळवाण्या कामातून एखादं काम स्किप केलं तर किती बरं होईल! किमान तेवढा तरी मोकळा वेळ मिळेल. थंडीच्या दिवसात तर लवकर उठून ब्रश करणे, फ्रेश होणे, आंघोळकरणे किती जीवावर येते, पण करणार काय शेवटी? आंघोळला एखाद दिवस बुट्टी मारली तरी, फ्रेश नाही वाटत. त्यातही एखादी दिवस नाही केली आंघोळ तर दुसऱ्या दिवशी तर करावीच लागणार. वर्षानुवर्षे कुणी आंघोळ न करता राहू शकतो का? नाही, अजिबात नाही. अशा माणसाच्या सावलीला उभे राहण्याचीही कुणी कल्पना करणार नाही. अंघोळ न करणाऱ्या माणसांना आपण वेडे समजतो. हो की नाही?

इराणच्या केरमांशहा परिसरातील देजगाह गावात राहणाऱ्या अमाऊ हाजी नावाच्या एका इसमाने अशीच आंघोळला बुट्टी मारली. एक दिवस, दोन दिवस नाही तर तब्बल सहा दशके! हो, हो बरोबरच वाचलेत. ८७ वर्षाच्या अमाऊ हाजी यांनी गेल्या साठ वर्षात एकही दिवस आंघोळ केलेली नाही. आता इतके दिवस आंघोळ न करणारा माणूस कसा दिसत असेल? तुम्ही कल्पनाच केलेली बरी.

या हाजी आजोबांकडे पहिले तर असे वाटते जणू हे कुठल्या तरी कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर आलेत की काय? संपूर्ण अंगाला कायम राख आणि माती फासलेली असते. पाण्याशी जणू याचं हाडवैरच आहे. म्हणजे खरोखरच. कारण, त्यांना असं वाटतं की जर अंघोळ केली तर आपण आजारी पडू. (कदाचित यांनी किटाणूशी लढणाऱ्या साबणांची जाहिरात पहिली नसेल. असो!)

या हाजी आजोबांचा आहार बघितला तर नाक मुरडून मुरडून तुमचं नाक मोडण्याची शक्यताच जास्त आहे. पण, त्याचं हाजी आजोबांना काही देणंघेणं नाही. ते मृत प्राण्यांच्या कुजलेले मांस खाऊनच पोट भारतात. गेली कित्येक वर्षे ते हेच खात आहेत. त्यातही साळींदराचे मांस म्हणजे आजोबांसाठी मेजवानीच. आजोबा चिलीम ओढतात. आता तुम्ही विचार कराल ओढत असतील तंबाखू टाकून चिलीम. पण नाही. इथेही आजोबांची निवड खूपच हटके आहे. प्राण्यांची पक्ष्यांची वाळलेली विष्ठा गोळा करून एका घाणेरड्या पाईपमध्ये टाकतात आणि त्याची चिलीम ओढून मस्त धुंदीत जगतात. पाण्याशी वैर असलं तरी, दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी हमखास पितात. यासाठी त्यांना कुठल्याही डबक्यात साचलेलं पाणी चालतं. स्वच्छ आणि ताजंच पाणी हवं असाही त्यांचा हट्ट नसतो. पण, त्यांना पोटभर पाणी हे लागतंच.

हाजी आजोबांच्या तरुणपणी त्यांना कोणतातरी मानसिक धक्का बसलेला असावा, असा या परिसरातील लोकांचा अंदाज आहे. म्हणूनच त्यांनी स्वतःला असं इतरांपासून तोडून घेतलेलं असावं. रूढ जगाच्या नीतीनियमांना तिलांजली देऊन असं आयुष्य जगण्याची कुणाला हौस असेल. पण त्यांनी तरुणपणी असा काय अनुभव घेतला की ज्यामुळे त्यांनी संपूर्ण जगाला असं वाळीत टाकलं आहे, ते त्यांचं त्यांनाच माहित.

हाजी आजोबांना राहण्यासाठी गावातील लोकांनी एक छोटासा आसरा करून दिला आहे. पण या आजोबांचा त्यात जीव रमत नाही. जमिनीखालील एखाद्या भुयारात किंवा बिळातच राहायला त्यांना आवडतं. गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी विटांच्या चार भिंती उभारल्या आहेत. कधीकधीच हे आजोबा त्यात राहायला जातात. नाहीतर जमिनीखालील बिळातच ते खुशाल पडून असतात.

माणसापासून आणि माणसाच्या रीतीभातींपासून इतके अलिप्त राहूनही हे आजोबा ८७ वर्षांचे दीर्घायुषी  आयुष्य जगलेच कसे, हे मात्र एक अजब कोडे आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख