या सक्तीच्या सामाजिक दुराव्याच्या काळात आपल्या सर्वांचे काम थबकले आहे. स्तब्ध झाले आहे. पण सर्जनशीलतेला ही बंधने मंजूर नसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे चित्रकार सुनिल धोपावकर! १११ दिवसांच्या लॉकडाउनच्या प्रदीर्घ काळात त्यांनी १३० बोलक्या अक्षरांची निर्मिती केली आहे. आज काही निवडक नमुन्यातून श्री. सुनिल धोपावकर यांच्या निवडक टायपोग्राफीची अदाकारी बघूया!

धोपावकरांच्या चित्राक्षरांचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य आहे की त्यांची चित्राक्षरे मनात अनुभूतीची कंपने निर्माण करतात. पण मनावर आघात करत नाहीत. या अक्षरांना जोडलेल्या प्रतिमा अक्षरांसोबत एकजीव होतात. त्यांचे वेगळे अस्तित्व जाणवू देत नाहीत. अक्षरांना बोलके करण्यासाठी हाच प्रभाव अपेक्षित असतो. तो नेमका या अक्षरांमध्ये साधलेला आहे.




