रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यामध्ये धुसफूस नेहेमीच चालू असते. हा तंटा आपल्या कानावर येत नाही कारण ही पत्रापत्री सौम्य भाषेत, शासकीय भाषेत चालू असते. खरी बाचाबाची अर्थमंत्री, अर्थ खात्याचे सचिव आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांच्यामध्ये चालते. अशी प्रकरणं राजीनाम्याच्या पातळीवर सहसा जात नाहीत, पण आज आम्ही जो किस्सा सांगणार आहोत मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याचा जेव्हा ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.त्याचं झालं असं की जेव्हा मनमोहन सिंग गव्हर्नर होते तेव्हा अर्थमंत्री होते प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी ! प्रणब मुखर्जी आणि मनमोहन सिंग यांचं मुळातच फारसं सख्य नव्हतं, बारीकसारीक चकमकी होतच असायच्या.







