मंडळी, सध्या लग्नसराई आणि साखरपुड्याचे दिवस आहेत. झालंच तर दोनचार महिन्यांत गौरी-गणपती यायचीही वेळ येऊन ठेपते. त्यामुळं महिलावर्गासाठी नव्या कपड्यांची खरेदी आणि ठेवणीतले कपडे बाहेर काढायची हक्काची वेळ झालीय. इतरांच्या घरी समारंभाला जायचं असेल, तर आपलं वेगळेपण खूप भपका न करता उठून दिसायला हवं ही तर सगळयांची अपेक्षा असते. पण, आपल्या घरचं कार्य असेल तर वेगळेपण आणि उठून दिसणं दोन्ही झोकात व्हायलाच लागतं!! खरं की नाही??
आता मग छान नवे पारंपरिक कपडेही हवेत, पण त्यात मॉडर्नही दिसायला हवं, आपली फॅशन थोडी वेगळीही हवी आणि त्यात प्रत्येक कार्यक्रमाला वेगळे कपडे-वेगळा लूकही हवा... हे सगळं साधायचं कसं?? चिंताच नको, आम्ही आहोत ना.. खास आमच्या वाचकमैत्रिणींसाठी आणि पुरुषवाचकांच्या मैत्रीणींसाठी बोभाटा घेऊन आले आहे पारंपरिक आणि मॉडर्न असे ७ वेगवेगळे सदाबहार ठरतील असे लूक्स. साखरपुडा, मेहंदी, हळद, लग्नाच्या आधी-लग्न लागताना-रिसेप्शन ते अगदी सत्यनारायणापर्यंत फुलटू तयारी होईल पाहा..




















