भारतात सरकारी नोकरी हेच सर्वात चांगले करियर समजले जाते. खासगी नोकरीतली असुरक्षितता आणि बिजनेसमधली रिस्क दोन्ही इथे नसते. दर महिन्याला पगार होत असतो. मधूनमधून वेतन आयोग येतात आणि पगारही वाढतो. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे लोकांच्या अंगवळणी पडले असल्याने कामाचेही टेन्शन नसतेच. सगळे कसे सुखासुखी सुरू असते अशी समाजाची धारणा आहे. एकप्रकारे ते बरोबर पण आहे. सरकारी नोकरी असली म्हणजे चांगले स्टेट्स, चांगला पगार, सुखसोयी सगळे मिळते म्हणून सर्वांचा ओढा तिकडे दिसून येतो. आजच्याच बातमीनुसार आय आय टी मुंबईमध्ये बी.टेक. आणि एम. टेक. केलेल्या श्रावणकुमारने धनबादच्या रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेनर म्हणून नोकरी स्वीकारली आहे.
पण सरकारी नोकरी मिळवणे सोपे नाही ना राव!! मुलं स्पर्धा परिक्षांचा १०-१२ तास अभ्यास करतात तरी सगळ्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. यात काही बहाद्दर मात्र २-३ परीक्षा पास होतात, तितक्याच नोकऱ्या मिळतात आणि ते त्यांतला त्यांना आवडणारा पर्याय निवडतात.







