बोभाटाच्या बागेत आज आपण एक विशेष दिवस आपण साजरा करणार आहोत. या खास दिवसाचे नाव आहे 'जागतिक बांबू दिवस'! जन्माला आल्यावर ज्या पाळण्यात आपण सुखाची निद्रा घेतो त्या घडीपासून शेवटी चिरनिद्रेची घडी येईपर्यंत बांबू आपल्या सोबत असतो. हजारो वर्षं बांबूने आपल्याला साथ दिली आहे, पण पहिला जागतिक बांबू दिवस १८ सप्टेंबर २००९ साली साजरा करण्यात आला. यावर्षी आपण ११ वा बांबू दिवस साजरा करणार आहोत. याचे श्रेय एका भारतीयाकडे जाते, ज्यांचे नाव आहे कामेश सलाम! २००९ साली बँकॉक येथे भरलेल्या इंटरनॅशनल बांबू काँग्रेसमध्ये त्यांनी हा प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतला. याच क्षेत्रात अभिमानाने घ्यावे असे दुसरे भारतीय नाव म्हणजे आय. व्ही. रामानुजा राव. हे राव वर्ल्ड बांबू ऑर्गनायझेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत.
भारतात काश्मीर वगळता सर्व राज्यात बांबू उगवतो, वाढतो, वापरला जातो. एकेकाळी गरीबांचा साग म्हणून हिणवला गेलेला बांबू म्हणजे 'ग्रीन गोल्ड' आहे याची जाणीव आता हळूहळू सार्वत्रिक होते आहे आणि अनेक सरकारी योजनांच्या माध्यमातून बांबू शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आहे. आजच्या लेखात आज आपण बांबूची वनस्पती म्हणून ओळख तर करून घेणारच आहोत, सोबत काही योजनांची माहिती पण करून घेणार आहोत.






















