करायला गेली एक आणि झालं भलतंच....या चायनीज अभिनेत्रीचं नाक काळं ठिक्कर कसं पडलं?

लिस्टिकल
करायला गेली एक आणि झालं भलतंच....या चायनीज अभिनेत्रीचं नाक काळं ठिक्कर कसं पडलं?

आपलं सौन्दर्य अजून खुलावं म्हणून कितीतरी मॉडेल्स, अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात, हे सर्वांनी ऐकलच असेल. काहीजणी नाकाची, ओठांची, हनुवटीवर सर्जरी करून घेतात. याला प्लास्टिक सर्जरीही म्हणतात. अनेक हॉलीवूड, बॉलीवूड अभिनेत्रीनाही याची भुरळ पडली आहे आणि त्यांनी ही प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे, अर्थात हे कोणी अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. 

चीनच्या आघाडीच्या अभिनेत्रीनेही अशी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली आणि त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. ते फोटो पाहून अनेक जणांना धक्काच बसला. कारण तिने केलेली नाकाची  सर्जरी पूर्णपणे चुकली आणि ती पूर्णपणे यात फसली आहे. नक्की काय झालंय? चला पाहूया.

या चिनी अभिनेत्रीचे नाव आहे गाओ लियू. ती चीनमध्ये आघाडीची नटी असून गायिकाही आहे. अनेक तरुण तरुणी तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. एका मित्राने तिला नाक ट्रिम करण्याचा सल्ला दिला. अनेकजण करत असल्याने तिलाही यात काही चुकीचं वाटलं नाही म्हणून मागच्यावर्षी तिने ग्वान्गझू येथील एका कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिकमध्ये नाकाची सर्जरी करून घेतली. तब्बल चार तास ही सर्जरी चालली. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर नाकावरच्या पेशी मृत झाल्या आणि तिथे सूज आली. यानंतर अजून काही वेळा उपचार करण्यात आले पण नाकाचा आकार अजून बिघडत गेला. नाक सुंदर दिसण्याऐवजी पूर्वीपेक्षा अजून विद्रुप दिसू लागले. तिला याचा प्रचंड धक्का बसला. तिने तक्रार केल्यानंतर कळले की हे क्लिनिक अनधिकृत आहे. त्यांच्याकडे परवाना देखील नव्हता

गाओला यामुळे दोन भूमिकांना मुकावे लागले. तिने भूमिकेसाठी केलेला करार मोडला त्यात तिचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. असं म्हणतात जवळजवळ २० लाख युआनची भरपाई तिला करावी लागेल. पुढचे कामही तिला लवकर मिळणे अवघड जाईल. म्हणजे पूर्ण करियर धोक्यात आलं की काय! अशी वेळ तिच्यावर आली आहे. तरीही या अभिनेत्रीने इतरांनी बोध घ्यावा म्हणून ही पोस्ट केली आहे. तिने फोटोही शेयर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. त्या क्लिनिकची चौकशी सुरू आहे.

चीनच्या कॉस्मेटिक सर्जरीची बाजारपेठ गेल्या पाच वर्षात ३० टक्क्यांनी वाढली आहे. याची आर्थिक उलाढाल तब्बल ३६.७१ अब्ज डॉलर इतकी आहे. पुढच्या पाच वर्षात हा आकडा अजून वाढून १ हजार अब्जाच्यावर जाईल असा अंदाज केला जातोय.

नैसर्गिक सौन्दर्य सोडून या अश्या सर्जरी करून मिळालेलं प्लास्टिक सौन्दर्य आणि ते मिळवण्यासाठी किती मोठा धोका घ्यावा लागतो हे यातून लक्षात येतं. अभिनेत्रींनी ही अशी रिस्क घेणं गरजेचं आहे का? तुमचं मत जरूर कळवा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख