ही कहाणी एका गुप्तहेराच्या आयुष्यातील शेवटच्या रात्रीची आहे. उजाडणार्या दिवशी सकाळी त्याला फाशी देण्यात येणार होती. ही कथा अलीकडल्या काळातील नाही. ही कथा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात हेरगिरी करणार्या एका भारतीयाची आहे. ही कहाणी कानपूरच्या गाजलेल्या आणि इतिहासात अजूनही बरीच चर्चा होत असलेल्या 'बिबीघर' हत्याकांडाच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे देते. पण हे आम्ही म्हणत नाही, तर तो हेर ज्या ब्रिटिश अधिकार्याच्या ताब्यात होता त्याच्या आत्मवृत्तात हा वृतांत आहे. चला तर वाचूया त्या रात्री काय घडले होते...
१८५८ साली कॉलीन कँपबेल लखनऊचा वेढा ऊठवण्यासाठी निघाला होता. तीस हजार सैनिक आणि दिडशे तोफा घेऊन निघालेल्या या सैन्याची छावणी ऊन्नावला पडली होती. कॉलीन कँपबेलच्या हाताखाली जे अधिकारी होते त्यापैकी एक अधिकारी फोर्ब्ज मिशेल (मिचेल) याने Reminiscences of the Great Mutiny: 1857-59 या पुस्तकात या भारतीय गुप्तहेराची कहाणी सांगितली आहे. त्याच्याच शब्दात ही कहाणी पुढे वाचूया!











