कोरोनाने देशाला गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या विळख्यात घेतले आहे. देशात या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन होता. अन्नही मिळत नाही अशी परिस्थिती गेल्या अनेक वर्षात देशाने पहिल्यांदा अनुभवली. पण याही परिस्थितीत काही लोकांनी अन्न पुरवण्याचे काम केले. पण आज ज्या अफलातून माणसाची गोष्ट आम्ही सांगणार आहोत तो माणूस गेली १२ वर्षे निस्वार्थपणे गरजूंना अन्न पुरवत आहे.
केरळमधील कोन्नूर जिल्ह्यातील सिपी सुरेश कुमार यांनी गेल्या १२ वर्षात तब्बल ४ लाख लोकांना जेवण पुरवले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या बचतीतून हे काम केले. पुढे त्यांनी बॅनर तयार केला आणि त्याच्या कॉपीज ५० विविध ठिकाणी लावल्या. या बॅनरवर लिहिले होते, 'ज्यांच्याकडे जास्तीचे अन्न असेल ते कन्नूर तालुका ऑफिसजवळ येऊन जमा करू शकतात, हे अन्न गरिबांमध्ये वाटले जाईल.'






