नंदुरबार हा महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला असलेला शेवटचा जिल्हा अनेकार्थाने विशेष आहे. खान्देशातल्या तीन जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या नंदुरबारच्या नावाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण सर्वात जास्त सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे, नंद नावाच्या राजाने वसवले म्हणून नंदुरबार नाव पडले असे म्हटले जाते. नंदुरबारला लोक प्रेमाने नंदनगरी म्हणतात. नंदुरबार जिल्हा आधी धुळे जिल्ह्याचा भाग होता पण १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.
या जिल्ह्याला तसा राजकिय इतिहास मोठा आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यावर पहिली सभा घेतली तो जिल्हा नंदुरबार!! एवढेच नव्हे तर आज देशभर प्रत्येक ठिकाणी लागणाऱ्या आधारची सुरुवात देखील नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावापासून झाली होती.





