टाईम मासिक वर्षभर प्रभाव पाडणाऱ्या लोकांची एक यादी दरवर्षी प्रसिद्ध करते. या मासिकात नाव येणं ही मोठी गोष्ट. यावर्षीच्या टाईमच्या यादीत बरीच भारतीय नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिनेअभिनेता आयुष्यमान खुराणा, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई.. या सर्वांचं टाईममध्ये नाव आल्याबद्दल कौतुक तर आहेच, पण या यादीत असलेलं एक नाव मात्र कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. त्यांचे नाव थेट टाईम मासिकात आल्यावर सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ते नाव आहे रवींद्र गुप्ता!!!
कोण आहेत हे रवींद्र गुप्ता? रविंद्र गुप्ता क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी हा विषय शिकवणारे प्राध्यापक आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन शहरात आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट नावाच्या संस्थेत ते शिकवतात, सोबत केम्ब्रिज विद्यापीठात क्लिनिकल सायन्स या विषयासाठी असलेल्या वेलकम ट्रस्टवर देखील त्यांची वर्णी लागलेली आहे.






