शेअर बाजारात लिस्टींग झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे दोन भागांत म्हणजे Aआणि B असे वर्गीकरण केले जायचे. ज्या शेअरमध्ये जास्तीतजास्त ट्रेडींग व्हायचे ते A ग्रुपमध्ये आणि बाकीचे B ग्रुप मध्ये असायचे. दर दोन आठवड्याने झालेल्या सौद्यांची लेन -देन व्हायची ज्याला 'बदला' म्हटले जायचे. A ग्रुपमधल्या शेअरचे सौदे 'फॉरवर्ड' होऊ शकायचे. एका पंधरवड्यातले सौदे दुसर्या पंधरवड्यात ढकलले जाऊ शकायचे. पण सौदा फॉरवर्ड करण्यासाठी तात्पुरते फंडींग उभे करावे लागायचे. ते फंडींग करणारेही अनेकजण बाजारात असायचे. त्यांना जे व्याज मिळायचे त्याला 'व्याज बदला' म्हणायचे. अनेक ब्रोकर फक्त 'व्याज बदला' करण्याचेच काम करायचे.
A ग्रुपचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात शेअर 'शॉर्ट' करण्याचे सौदे करण्याची मुभा होती. 'शॉर्ट' करणे म्हणजे हातात नसलेले शेअर विकणे आणि त्याचा भाव कमी झाल्यावर खरेदी करून व्यवहार पूर्ण करणे. बाजाराच्या भाषेत खरेदी करणे म्हणजे 'लाँग' पोझीशन घेणे आणि विक्री करणे म्हणजे 'शॉर्ट' पोझीशन घेणे. पंण बोलताना त्याला माथे ('शॉर्ट) आणि पोते (लाँग) असे शब्द होते.








