महाबळेश्वर. पुण्यामुंबईच्या पर्यटकांसाठी हाकेच्या अंतरावर असलेलं नंदनवन. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य, थंड हवेचं ठिकाण ही त्याची पहिली ओळख. इथले वेगवेगळे पॉइंट्स, तिथून दिसणारा सूर्यास्ताचा विहंगम सोहळा, घनदाट जंगलांचं वैभव, चित्रकाराच्या कुंचल्याला भुरळ पाडेल अशी निसर्गदृश्यं, वळणावळणांचे घाट आणि स्ट्रॉबेरीचे मळे अशा टप्प्यांमधून ही ओळख अजून गहिरी व्हायला लागते. एक मात्र खरं, महाबळेश्वर हे वीकेन्ड डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलं तरी इथल्या परिसराची खरी ओळख होण्यासाठी २ दिवस पुरेसे नाहीत. निवांतपणा असेल तर किमान पाच-सहा दिवस हाताशी ठेवून तिथे जायला हवं. इथल्या परिचित आणि अपरिचित ठिकाणांची मनमुराद भटकंती करायला तेवढा वेळ लागतोच! समुद्रसपाटीपासून ४४३९ फुटांवर वसलेल्या आणि आज आघाडीचं पर्यटनस्थळ बनलेल्या महाबळेश्वरचा इतिहासदेखील रंजक आहे.
पौराणिक नाव, ८०० वर्षांचा इतिहास, ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी ते स्ट्रॉबेरी!! वाचा महाबळेश्वरची पूर्ण कहाणी!!

पुराणकाळातील महाबळेश्वरबद्दलची दंतकथा
महाबळेश्वर हे शंकराच्या नावावरून पडलेलं नाव. पुराणकाळात ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीसाठी इथल्या घनदाट जंगलात तपश्चर्या केली होती. त्यावेळी महाबली आणि अतिबली नावाच्या दोन राक्षसांनी त्यांच्या तपात विघ्न आणण्यास सुरुवात केली. त्यावेळी या राक्षसांचा नि:पात करण्यासाठी भगवान विष्णू ब्रह्मदेवाच्या मदतीला आले आणि त्यांनी अतिबलीचा वध केला. मात्र महाबलीला इच्छामरणाचं वरदान होतं. त्यामुळे त्याला मारणं भगवान विष्णूंना शक्य नव्हतं. मग त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी देवी महामाया हिला मदतीसाठी पाचारण केलं. तिने आपल्या सौंदर्याची महाबलीला भुरळ पाडली. महाबली इतका मोहित झाला, की त्याने तिला जे हवं असेल ते माग असा वर दिला. त्याचाच फायदा घेत महामायेने त्याचं मरण मागितलं. महाबलीचा नाइलाज झाला. मात्र मृत्युपूर्वी त्यानं आपलं नाव भगवान शंकरांबरोबर जोडून या जागेला ते नाव देण्यात यावं अशी इच्छा प्रकट केली. त्यावरून हे ठिकाण महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
महाबळेश्वरचा इतिहास
महाबळेश्वरचा आपल्याला माहित असलेला इतिहास इ. स. १२१५ पर्यंत मागे जातो. तेव्हा देवगिरीचा यादव राजा सिंघम याने या परिसराला भेट दिली होती. या सिंघमने तिथं एक मंदिर आणि कृष्णा नदीच्या उगमापाशी छोटा तलाव बांधला असं मानलं जातं. विशेष म्हणजे दख्खन पठाराच्या या भागात जमिनीखालच्या गुहांमध्ये या नदीच्या पाण्याचे साठे आहेत. या साठ्यांतून झरेही उगम पावले आहेत.
यादवांनंतर या प्रदेशावर अनेक राजसत्ता येऊन गेल्या. त्यात दिल्लीच्या सुलतानांचे सरदार, बहामनी राज्य, त्यातून फुटून निघालेली राज्यं, आणि अहमदनगर आणि विजापूरची राजघराणी असे बरेच राज्यकर्तेहोऊन गेले. अहमदनगरच्या निजामशहाने शिर्के नावाच्या स्थानिक सरदाराला महाबळेश्वरची जहागिर दिली होती. मात्र पुढे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि निजामाने शिर्केंच्या जागी मोरे नावाच्या सरदाराची नेमणूक केली. मोर्यांच्या ७ पिढ्यांनी महाबळेश्वर आणि जावळीच्या खोर्यावर राज्य केलं. या जावळीच्या मोऱ्यांची गोष्ट शाळेत आपण वाचली आहेच.
१९ व्या शतकात महाबळेश्वरनं अनेक स्थित्यंतरं पाहिली. १८२४ च्या उन्हाळ्यात जनरल पी. लुडविक नावाचा इंग्रज अधिकारी या भागाच्या निसर्गसौंदर्याबद्दल ऐकून इथे भेट देण्यासाठी आला. या भूमीवर गोर्या साहेबाचं हे पहिलं पाऊल. इथल्या निबिड अरण्यात जंगली श्वापदांच्या सान्निध्यात, हातातल्या वॉकिंग स्टिकने घनदाट झाडीतून अक्षरश: वाट काढत त्याने हा परिसर पायाखालून घातला. या भागाची त्याला चांगलीच मोहिनी पडली. तिथून परतल्यावर त्याने ‘द बॉम्बे कुरिअर’ या वर्तमानपत्राला पत्र लिहून इथल्या निसर्गाचं आणि आल्हाददायी हवेचं वर्णन केलं.

(पी. लुडविक यांच्या आठवणीत उभारलेलं महाबळेश्वर येथील स्मारक) स्रोत
हे वातावरण बरंचसं जुन्या काळातल्या इंग्लंडसारखंच होतं आणि त्यामुळेच ते युरोपीय लोकांना भावण्यासारखं होतं. यातून प्रेरणा घेत दक्षिण भारतातील अमेरिकन मिशनचा संस्थापक आणि न्यू टेस्टामेंटचा मराठी अनुवादक गॉर्डन हॉल यानेही महाबळेश्वर परिसराला भेट दिली. त्यानंतर १८२५ मध्ये कर्नल ब्रिग्ज याने इथे भेट दिली. या भागात युरोपीय लोकांसाठी सॅनेटोरियम बांधता येतील ही कल्पना त्याच्या डोक्यात आकार घेऊ लागली. भारतातलं हवामान उष्ण असल्याने ब्रिटिश अशा थंड हवेच्या ठिकाणांच्या शोधात असायचेच. उन्हापासून बचाव करण्यासाठी उंचावरील थंड ठिकाणी ते उन्हाळ्यात राहायला जात. महाराष्ट्रात ते त्यांना महाबळेश्वरच्या रूपाने मिळालं. ब्रिग्ज याने लगोलग सातारच्या राजाला पत्र लिहून महाबळेश्वरला जाण्यासाठी चांगला रस्ता बांधायची विनंती केली. त्याचदरम्यान त्याने तेथे आपल्या कुटुंबाला राहण्यासाठी छोटं घर बांधलं.
(जुनं महाबळेश्वर)
ब्रिग्जच्या अहवालामुळे ब्रिटिशांमध्ये महाबळेश्वर या ठिकाणाविषयी उत्सुकता निर्माण झाली. १८२८ मध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी येथे भेट दिली. त्यांचं जंगी स्वागत झालं. सर माल्कम इतके प्रभावित झाले की त्यांनी सातारच्या राजाला महाबळेश्वर हे शहर खंडाळा या गावाच्या बदल्यात देण्याची विनंती केली. त्यांचा या विषयातला रस पाहून महाराजांनी याला संमती दिली. नाहीतरी त्यांना प्रशासन चालवणं सोपं जावं यासाठी महाबळेश्वरचं लहान तालुक्यांमध्ये (पेठा) विभाजन करायचं होतंच. माल्कम यांनी या पेठेला राजाचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला. खुद्द राजाने मात्र तो नाकारत सर जॉन माल्कम यांचं नाव या पेठेला देण्याचं ठरवलं. आजही माल्कम पेठ हे नाव कायम आहे.
पुढच्याच वर्षी म्हणजे १८२९ मध्ये महाबळेश्वरला ब्रिटिशांची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं.
(जुनं पंचगंगा मंदिर)
पुढचं दशक वेगवान घडामोडींचं आणि एकंदरीतच भरभराटीचं होतं. याच काळात इथे अनेक इमारती, वैभवशाली वास्तू उभ्या राहिल्या. सर बार्टल फ्रेअर याने मुंबईतल्या डॉ. भाऊ दाजी लाड, सर जमशेटजी जीजीभॉय, कावसजी जहांगीर, डेव्हिड ससून अशा अनेक नामवंत मंडळींचं लक्ष महाबळेश्वरकडे वेधून घेतलं. त्यांना येथे भेट द्यायला प्रवृत्त केलं. यातली बहुतांश मंडळी कापसाच्या व्यापारातून धनिक बनलेली होती, त्यांनी इथे जागा खरेदी केल्या. अनेकांनी आपल्यातल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं. सर मोरारजी गोकुळदास यांनी येथे हॉस्पिटलच्या बांधणीत मदत केली. हे हॉस्पिटल त्यांच्याच घरात बांधलं जात होतं. याच घरात महात्मा गांधी १९४५ मध्ये येथे आले असताना राहिले होते. फ्रामजी नुसेरवानजी यांनी प्रवाशांसाठी धर्मशाळा बांधली.
आजही महाबळेश्वरचा वैभवशाली वसाहतरूपी भूतकाळ खांद्यावर वागवत इथली मंदिरं आणि वास्तू उभ्या आहेत. काही पडझड झालेल्या अवस्थेत तर काही चांगल्या प्रकारे जतन केलेल्या आहेत.
हे सगळं खरं, पण या स्ट्रॉबेरी कधी आणि कुठून आली?
महाबळेश्वरची एक महत्त्वाची खासियत म्हणजे स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीच्या लागवडीची माहिती झाली ती चीन आणि मलाया या देशांच्या कैद्यांमुळे. सन १८३४ ते १८६४ या काळात या कैद्यांना इथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांना तुरुंगात असताना बटाटे, इंग्लिश भाज्या आणि बेरीज यांची शेतात लागवड करण्यास उत्तेजन दिलं जायचं. जेव्हा हे लोक गेले, तेव्हा त्या शेतांचा ताबा स्थानिक लोकांकडे आला. त्यातूनच पुढे स्ट्रॉबेरीची लागवड फोफावली. इथलं हवामान स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी अनुकूल असल्याने भारतातील स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनापैकी ८५% उत्पादन एकट्या महाबळेश्वरमध्ये होतं. २०१४ मध्ये भारताला स्ट्रॉबेरीसाठी जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेटर) टॅग देखील मिळाला होता.
वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा सारा परिसरच अतिशय सुंदर आहे. महाबळेश्वर तर आपल्या अंगाखांद्यावर इतिहासाच्या खुणांसोबत पर्यटकांसोबत आधुनिकतेची झूल पांघरून दिमाखात उभं आहे. इथं महाराष्ट्रातलं कुणी गेलं नसेल असं सहसा व्हायचं नाही. असं झालं जरी असेल, तरी या लेखाचं निमित्त घ्या आणि शक्य होईल तेव्हा एक चक्कर टाकाच. काय म्हणता?
लेखिका : स्मिता जोगळेकर
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१