भारत मसाले खाण्यात, पिकवण्यात आणि विकण्यात जगात सर्वात पुढे आहे. International Organization for Standardization संस्थेने १०९ मसाल्यांची जी यादी तयार केली आहे त्यातील ७५ पद्धतीचे मसाले तर एकट्या भारतात तयार होतात. या ७५ मसाल्यांमध्ये जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक असलेल्या मसाल्याचाही समावेश होतो. हा मसाला म्हणजे 'केशर'.
जगातल्या महागड्या मसाल्यांपैकी एक केशरची काश्मीरमधली लागवड कशी होते ?


केशर पिकवण्यात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भारतात केशर पिकवण्याचा पहिला मान जम्मू काश्मीरला जातो. केशराचे मोन्ग्रा आणि लाचा हे दोन प्रकार खास काश्मीरमध्ये पिकणारे आहेत. साधारणपणे काश्मीरमध्ये पिकणाऱ्या केशराचा रंग गडद लाल-जांभळा असतो. हीच काश्मीरी केशराची ओळख आहे.
आजच्या लेखातून आपण जम्मू काश्मीर भागात केशराची लागवड आणि केशराबद्दल असलेली काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

केशर काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या दक्षिणेकडील पम्पोर भागात पिकते. तुम्हाला माहित असेलच की केशर हे फुलाच्या मधोमध असणारे पुंकेसर आहे. या पुंकेसरला वेगळं करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे शेतकरी हातांनीच फुले तोडून त्यातून केशर वेगळे करतात. ४०,००० फुलांपासून असे अर्धा किलोग्राम केशर मिळते. आता तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की केशर महाग का आहे.

केशराच्या किमतीत वाढ करणाऱ्या इतरही बाबी आहेत. केशर पिकवायला फुलांच्या लागवडीपासून ते केशर मिळेपर्यंत प्रचंड मेहनत लागते. याखेरीज केशराचा वास, रंग यावरूनही दर्जा ठरतो. जम्मू आणि काश्मीरबाबत बोलायचं झालं तर तिथली अस्थिर परिस्थिती आणि बरेचदा पिक वाया जात असल्याने तिथल्या केशराला जास्त पैसे मोजावे लागतात.

केशरबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी
केशर हे जगभर अन्नपदार्थात वापरलं जातं. याखेरीज केशरचा वैद्यकीय उपयोगही होतो. केशर अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखलं जातं. पोटाच्या विकारांवर केशर गुणकारी समजलं जातं.

सध्या इराण हा जगातील केशराच्या बाजारपेठेवर राज्य करणारा देश आहे. इराण पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. त्यातही खासकरून जम्मू काश्मीरला मान आहे.
आपले मसाले झाडाची साल, विशिष्ट झाडावरचे डिंक, झाडाचा चिक, पाने, बिया, फुले, फुलांचे भाग आणि कशाकशापासून निर्माण होतात. आपल्याला यांची इतकी सवय झालेली असते की त्यांची निर्मितीप्रक्रिया इतकी अवघड असेल असा मनात विचारही येत नाही. पुढच्या वेळी पेढ्यावर किंवा कशावरही केशर दिसेल, तेव्हा मात्र तुम्हांला हा लेख आठवल्याशिवाय राहायचं नाही, हो ना?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलबसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१