फेअर अँड लव्हली सोबत आपलं जुनं प्रेम आहे. कारण आपलं गोऱ्या रंगावरच भारी प्रेम आहे. गोष्टीतली राजकन्या गोरी आणि चेटकीण काळी, राम काळा पण सीतामय्या गोरी, कृष्ण काळा पण राधा गोरी! बायको कशी हवी गोरी इतकंच काय वहिनी पण 'गोरी गोरी पान फुलासारखी छान हवी' असते आपल्याला! फिल्मी गाण्यात पण राधा म्हणते 'मोरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दे दे! एकाच बाबतीत आपलं प्रेम काळ्यासोबत आहे ते म्हणजे काळा पैसा! तो पण गोरा म्हणजे व्हाईट करण्याची धडपड लोकं करतच असतात. एकूण हे गोऱ्या रंगाचं आकर्षण आपल्या सौंदर्य दृष्टीला लागलेलं ग्रहण आहे असं आजपर्यंत कोणी समजतच नाही. पण आता हळूहळू सामाजिक जागरण होतंय अशी चिन्ह दिसायला लागलीत
'फेअर ॲन्ड लव्हली'च्या नावातून 'फेअर' शब्द हटवला जातोय! पण का? कारण जाणून घ्या...


'फेअर ॲन्ड लव्हली' नावाची क्रीम माहित नाही, असा चुकूनच एखादा सापडेल. १९७५ मध्ये बाजारात आलेलं हे जगातलं पहिलं फेअरनेस क्रीम होतं. 'गोरेपणा म्हणजेच सौंदर्य' अशी मानसिकता असणाऱ्या प्रत्येकानं गोरं होण्याचा आशेनं ते वापरलंय. फेअरनेस क्रीम्सची जवळपास ७० टक्के भारतीय बाजारपेठ या एकट्या 'फेअर ॲन्ड लव्हली'ने काबिज केलीय. भारतच नव्हे तर आशियातल्या अनेक देशात ते वापरलं जातं.

आता मात्र हे उत्पादन बनवणाऱ्या 'हिंदूस्थान युनिलिव्हर' या कंपनीनं 'फेअर ॲन्ड लव्हली'च्या नावातून 'फेअर' (गोरेपणा) हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीनं सांगितलंय की कंपनीची उत्पादनं ही फक्त गोऱ्या त्वचेसाठी नाहीत. याबरोबरच 'फेअरनेस', 'व्हाईटनींग', 'लाईटनींग' हे शब्द गोरेपणाशी निगडीत असल्यानं त्यांचा वापरही उत्पादनांच्या नावात केला जाणार नाही, असं कंपनीनं जाहिर केलंय.
कंपनीला हा साक्षात्कार होण्यामागचं कारण आहे अनेक वर्षांपासून या क्रिमवर होत असलेली वर्णभेदाची टिका. सावळ्या व्यक्तीला गोरं, आणि गोऱ्या व्यक्तीला अजून गोरं बनवण्याच्या दावा या क्रिमच्या जाहिरातींमधून वर्षानुवर्षे केला जातोय. यामुळेच अशा सौंदर्य प्रसाधनं बनवणाऱ्या कंपन्यांवर वर्णभेदाला बढावा देत असल्याचा आरोप होत आलाय. त्यामुळं कंपनी आता 'फेअर ॲन्ड लव्हली' हे उत्पादन नव्या नावासोबत बाजारात आणणार आहे.

मध्यंतरी बॉलीवूडमधल्या काही कलाकारांनी अशा जाहिराती न करण्याचा निर्णय घेऊन या प्रकाराला विरोध दर्शवला होता. इंटरनेटवरही लोकांनी अशी उत्पादनांवर बंदी आणण्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर जगभरात वर्णभेदाविरूध्द आंदोलनं पेटली. त्यामुळं अमेरिकेच्या जगप्रसिद्ध 'जॉन्सन ॲन्ड जॉन्सन' कंपनीनं स्किन व्हाईटनींग उत्पादनं बनवणं थांबण्याचा निर्णय घेतला होता.
क्रीमचं नाव जरी बदललं तरी ते रंग उजळवणारं उत्पादन म्हणूनच वापरलं जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१