BSE आणि राजाबाई टॉवर वसवणारा 'प्रेमचंद रायचंद' होता मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज!!

लिस्टिकल
BSE आणि राजाबाई टॉवर वसवणारा 'प्रेमचंद रायचंद' होता मुंबईचा पहिला शेअर घोटाळेबाज!!

मंडळी, शेअरबाजार घोटाळा म्हटलं की बहुतेकांना पहिलं नाव आठवतं हर्षद मेहताचं!! सर्व सामान्य माणसांपर्यंत शेअर बाजार पोहचला तो हर्षद मेहेतामुळेच.  त्याआधी  हा बाजार काही मोजक्या सामाजिक वर्तुळापुरताच मर्यादित होता. जी काही अफरातफर व्हायची ती या वर्तुळाच्या परिघाच्या आतच व्हायची. हर्षद मेहताने हा परिघ राष्ट्रीय पातळीवर नेला आणि त्यामुळे घोटाळा म्हटलं की त्याचंच नाव पहिल्यांदा आठवतं. पण मंडळी, आज आम्ही तुम्हाला तब्बल दिडशे वर्षं जुनी अशी मुंबई शेअर बाजाराच्या एका 'आद्य 'घोटाळेबाजाची कथा सांगणार आहोत. "इतकी जुनी कथा ऐकण्यात काय मजा आहे आहे?" असं तुम्ही म्हणालही. पण गंमत अशी आहे की १८६२ च्या दरम्यानच्या त्या घोटाळ्यात आणि हर्षद मेहताच्या १९९२  घोटाळ्यात काहीही फरक नाही. फक्त इसवी सनाचे आकडे बदललेले दिसतील, नावं वेगळी दिसतील,  बाकी ज्याला 'मोडस ऑपरेंडी' म्हणजे गुन्हा करण्याची पध्दत म्हणतात, ती आहे तशीच आहे. चला तर, आजा वाचू या शनिवार स्पेशलमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या आद्य घोटाळेबाज प्रेमचंद रायचंदच्या 'बॅकबे रेक्लेमेशन ' फ्रॉडबद्दल!! 

(प्रेमचंद रायचंद)

या कथेला सुरुवात करण्यापूर्वी काही थोडी माहिती शेअरबाजाराबद्दल जाणून घ्या. या बाजारात नफा नुकसान ज्या पद्धतीने होते त्याला ' झिरो सम गेम  असे म्हणतात. याचा अर्थ असा की एकाने गमावल्याखेरीज दुसर्‍याचा फायदा होत नाही. थोडक्यात नफा आणि नुकसान यांची बेरीज केली तर उत्तर शून्यच येईल.  दुसरे असे की, प्रत्येक अफरातफरीत कमीतकमी एका बँकेचा तरी बळी जातोच. हर्षद मेहतामुळे कराड बँक गेली, केतन पारेखमुळे माधवपुरा बँक आणि ग्लोबल ट्रस्ट या दोन बँका बुडल्या, तर ज्या प्रेमचंद रायचंदबद्दल आपण वाचणार आहोत, त्यांच्यामुळे बाँबे बँक बुडली. आता वळू या मुख्य कथेकडे !

प्रेमचंद रायचंद हा रायचंद दिपचंद या श्रीमंत व्यापार्‍याचा मुलगा होता. त्याची आणखी ओळख म्हणजे बाँबे स्टॉक एक्सचेंज म्हणजे ज्याला तेव्हा नेटीव्ह स्टॉक एक्सचेंज म्हणायचे त्याच्या स्थापनेत हातभार लावला आणि आपल्या आईचं- राजाबाईचं नांव मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरला दिलं जावं म्हणून एकूण ५,५०,००० खर्चापैकी २ लाख रुपयांची भरभक्कम देणगी दिली. जात्याच हुषार असलेल्या या मुलाने जर इंग्रजी शिक्षण घेतले तर व्यापारात फायदा होईल या विचाराने वडिलांनी त्याला एल्फिन्स्टन महाविद्यालयात घातले. अपेक्षेप्रमाणे प्रेमचंद रायचंद हा मुंबई शेअर बाजारातला अस्खलित इंग्रजीतून व्यवहार करणारा पहिला स्टॉकब्रोकर झाला. काही दिवसांतच एक नंबरचा "बुलियन ट्रेडर" (सोने चांदीचा व्यापारी) आणि कमोडीटी ट्रेडर (त्यावेळी मुख्यतः कापूस आणि अफू) असे नाव पण त्याने कमावले. आता या सगळ्याचा मूळ कथेशी काय संबंध आहे ते बघू या!!

हा कालखंड साधारण १८६२ ते १८६६ चा होता. या काळात ब्रिटिशांना भारतातून कापूस आणि चीनमधून चहा मोठ्या प्रमाणात लागायचा. चीनला त्या मोबदल्यात अफू आणि चांदी हवी असायची. मँचेस्टरच्या कापडगिरण्यांसाठी ब्रिटनला कापूस हवा असायचा. पण या व्यवहारात ब्रिटनमधली चांदी संपुष्टात यायला लागली. साहजिकच भारतात चांदीचे भाव भडकले. अमेरिकन यादवीमुळे कापसाचे भाव भडकले. या दोन्हीत तेजी आल्यावर त्यात सट्टा सुरु झाला. हा सट्टा प्रेमचंद रायचंदच्या हातात होता. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळी सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हुंडीवर चालायचे. प्रेमचंद रायचंदच्या पेढीची हुंडी म्हणजे शंभर ट्क्के विश्वासार्ह, अशी ख्याती असल्याने कोणताही व्यवहार प्रेमचंद रायचंदच्या मध्यस्थीशिवाय पार पाडायचा नाही. थोडक्यात, मार्केट कोणतेही असो, त्या मार्केटच्या नाड्या किंवा सूत्रे एकाच माणसाच्या म्हणजे प्रेमचंद रायचंदच्या हातातच असायची!! अतिशय हुशार, धूर्त आणि दानशूर अशा या माणसाला त्याच्या कॉटन मार्केटच्या आणि शेअर बाजारातील यशस्वी सट्टय़ांमुळे मुंबईचा सगळ्यात मोठा सटोडिया हा किताब मिळाला होता. या प्रेमचंद रायचंद माणसाची खासियत अशीही होती की त्यांने घेतलेले शेअर्स त्याच्या नावावर कधीच नसायचे. मुनीम, मेहता, कारकून यांच्या नावावर तो सगळी गुंतवणूक करत असे.

असा धूर्त, हुशार आणि कावेबाज माणूस नेहेमी एखाद्या 'वन्स इन लाइफ टाइम 'मोक्याच्या शोधात असतो आणि संधी प्रेमचंद रायचंदच्या आयुष्यात अब्राहम लिंकनमुळे आली!! १८६० साली अब्राहम लिंकनने अमेरिकेतली गुलामगिरीला संपवली आणि अमेरिकेत यादवी सुरु झाली. मँचेस्टरला येणारा कापूस बंद पडला. भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. न्यूयॉर्कच्या कापसाच्या भावावर सट्टा सुरु झाला. भारतात तर न्यूयॉर्क कॉटनवर आकडा लावण्याची साथच आली. लोक त्यांच्याकडे आहे नाही ते सगळं काही विकून सट्टा खेळायला लागले. खेळीया अर्थातच एकच होता- तो म्हणजे प्रेमचंद रायचंद!! या सट्ट्यात प्रेमचंद रायचंदने इतके पैसे कमावले की त्याने चक्क एक बँकच विकत घेतली. त्या बँकेचं नाव होतं बाँबे बँक. एकदा बँक हातात आल्यावर त्याला आकाश मो़कळे झाले आणि जन्माला आली बॅकबे रेक्लेमेशन कंपनी!

तर, त्याकाळात मुंबईत कापसाच्या सट्टय़ात लोकांनी लाखो रुपये कमवायला सुरुवात केली होती. तेव्हाच मुंबईत नव्या कंपन्यांचे पेव फुटले. त्या एका वर्षामध्ये एकूण सत्तेचाळीस कंपन्यांची नोंदणी झाली. बँका तेव्हा शेअरमध्ये पैसे गुंतवण्यास कर्ज द्यायच्या नाहीत. प्रेमचंद रायचंदनी आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन या बाँबे बँकेला कर्ज दिले आणि हळूहळू बँक ताब्यात घेतली. यानंतर इतर बँकांनीही शेअर्समध्ये सट्टा करण्यासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. सोबत स्वत:साठीही प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले. पेपरमधली जाहिरात पूर्ण न वाचताच शेकडो अर्ज कंपन्यांकडे पैशांसकट येऊन पडायचे. शेअर्सची अलॉटमेंट होण्याआधीच त्यात सौदे लिहायला सुरुवात व्हायची. त्यावरचे प्रीमियम जाहीर व्हायला लागले. सगळ्या कंपन्यांना एकच दलाल हवा असायचा- प्रेमचंद रायचंद. बऱ्याच वेळा कंपन्या सटोडियाला पैशाऐवजी आणखी शेअर्स द्यायच्या. सटोडियाचं आणखी फावायचं. 

(कॉटन बाजार)

या सगळ्या नवीन उदयाला येणाऱ्या कंपन्यांत अशीच एक नवी कंपनी आली. बॉम्बे लँड रेक्लेमेशन कंपनी. या कंपनीला बॅकबे कंपनी म्हणून पण ओळखलं जायचं. आता जिथे नरिमन पॉइंट आहे, ती सगळी जमीन भराव टाकून ताब्यात घेण्याचं काम ही कंपनी करणार होती. त्याच वेळी भायखळा माझगाव परिसरात आणखी एक कंपनी आली. माझगावच्या बाजूला असलेला समुद्र हटवून जमीन तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही कंपनी तयार झाली होती. प्रेमचंद रायचंद यांच्या हुशारीचा एक किस्सा सांगितल्याशिवाय ही कथा पुढे सांगणं कठीण आहे. माझगावच्या डेव्हलपिंग राइट्सची किंमत साधारण पाच लाख गृहित धरली गेली होती. प्रेमचंद रायचंदनी हे राइट्स चाळीस लाख रुपये देऊन सकाळी विकत घेतले आणि संध्याकाळी साठ लाखाला विकून टाकले. सहा तासांत वीस लाख रुपये, तेही १८६४ सालचे वीस लाख रुपये या माणसाने कमावले होते. 

तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते..

तारतम्याचा अंत झाला की तेजी संपुष्टात येते..

(प्रेमचंद रायचंदचा बंगला)

हळूहळू मुंबईला तेजीच्या ज्वरांनी पछाडलं. जे शेठ करेल, तेच मुनीम करायला लागला, मुनीम करेल तेच मेहता म्हणजे अकाऊंटंट करेल, मेहता करेल ते कारकून कारकून करेल ते ड्रायव्हर आणि माळी. मुंबई शेअर बाजार तापून लाल झाला. आधी बॅकबे कंपनीचे चारशे शेअर्स सरकार घेणार होते, पण तो इरादा ऐनवेळी सरकारने बदलला. मग त्या चारशे शेअर्सचा लिलाव करण्यात आला आणि मग दोन लाख रुपयांचे शेअर्स दहा कोटी पाच लाखाच्या बोलीस विकले गेले.

आणि एक दिवस अमेरिकेतलं युद्ध संपलं. कापसाच्या व्यापाराला मंदीचं ग्रहण लागलं. सटोडिये पैसे चुकवायला टाळाटाळ करायला लागले. दिवाळखोरीची लाट आली. शेअर बाजार तीन दिवस बंद ठेवला गेला. पण पैशाची तरतूद होईना. एकामागोमाग कंपन्या बंद पडायला लागल्या. बॅकबे कंपनीसकट सगळ्या कंपन्यांनी गाशा गुंडाळायला सुरुवात केली. एकेक करून सगळे ब्रोकर दिवाळखोर झाले. आपले कथानायक प्रेमचंद रायचंद यांची सगळी मालमत्ता विकल्यावर एकूण देण्याच्या फक्त दीड टक्के रक्कम वसूल झाली. अशा तऱ्हेने बाँबे बँकही बुडाली.

(बँक ऑफ बॉम्बे)

वाचकांना एक विनंती...  प्रेमचंद रायचंद यांच्या वर लिहिलेल्या कथेत फक्त हर्षद मेहता हे नाव टाका, कथा तशीच्या तशीच आहे. केतन पारेखचं नाव टाकून बघा, कथा तशीच आहे. तशीच तेजी!  तसंच वारं डोक्यात जाणं! तसाच अंत!! फरक एवढाच की, हर्षद मेहता आणि केतन पारेख यांनी फ्रॉड करताना एक पायरी पुढे जाऊन खोटी कागदपत्र वापरली. या सटोडियांमध्ये साम्य असं की त्यांना आपण कुणीतरी महान झाल्याचा साक्षात्कार झाला होता. प्रेमचंद रायचंदने बांधलेला मुंबईचा राजाबाई टॉवर आजही याची साक्ष देतो आहे.

हे फ्रॉडस् कसे आणि का घडतात?

हे फ्रॉडस् कसे आणि का घडतात?

(हर्षद मेहता, प्रेमचंद रायचंद आणि केतन पारेख)

तर, छोटे छोटे गुंतवणूकदार असेच अल्पकाळाची स्मरणशक्ती असलेले असतात. एक फ्रॉड संपला की दुसरा घडेपर्यंत सगळेजण सगळं काही विसरलेले असतात. याआधीचे सगळे घोटाळे झाले तेव्हा आपण ग्लोबल नव्हतो. आपल्या अर्थव्यवस्थेच्या समस्या आपल्या खाजगी होत्या. आता ग्लोबल झाल्यावर जागतिक समस्या पण आपल्याच समस्या आहेत किंवा आपल्या समस्या जागतिक आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे प्रॉब्लेम आपले आहेत. 

In Global Economy,
A Bear sneezes at North pole
And a man dies in Peking.

 गेल्या काही वर्षांत भारतीय रिझर्व्ह बँक आपली आर्थिक व्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था यामधील धोरणात्मक समतोल सांभाळण्यात यशस्वी झाली आहे, परंतु घोटाळ्याचे सावट कायम डोक्यावर राहील... तुम्हांला याबद्दल काय वाटते??

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख