आधी गाण्याबद्दल बोलू या. हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलं आहे. एके काळी गाणं म्हणायला सांगीतलं की हे गाणं म्हणजे गाणार्याचं पहिल्या पसंतीचं गाणं होतं. ग.दि.माडगूळकरांनी जी अविट गोडीची गीतं आपल्याला दिली आहेत त्यापैकीच हे एक गाणं !
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक !
तळ्यातल्या बदकांच्या थव्यातलं एक पिल्लू , ज्याच्या मनात आपण इतरांसारखे नाही अशी खंत आहे, आपण बहिष्कृत आहोत अशी ठाम समजूत आहे अशा एका दु:खी पिल्लाला एक दिवस पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते आणि त्याला कळते की आपण इतर बदकांसारखे दिसत नाही कारण आपण सामान्य बदक नाही तर राजहंस आहोत ! हे गाणं ऐकताना -हे गीत वाचताना , अनेकांना आपण सामान्य नाही तर असामान्य आहोत याची प्रचिती यायची. खिन्न मनाला उभारी देणारं हे गाणं 'सुखाचा संसार' या चित्रपटासाठी मधुबाला जव्हेरी या गायीकेने गायलं होतं. संगीत दिग्दर्शक होते वसंत पवार.






