बोभाटांने ही बातमी २०१६ ला प्रसिद्ध केली होती. त्यावेळी आलेल्या मीडिया रिपोर्ट वरून ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. वर्ल्ड डेली न्यूज ही वेबसाईट हा सगळ्या रिपोर्ट्स चा मुख्य सोर्स होता. आज २०२० मध्ये या बातमीची सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी खरी नसावी. वर्ल्ड डेली न्युजने ही बातमी आपल्या वेबसाईट वरून काढून टाकली आहे.
सध्या काय परिस्थिती आहे?? आजवर त्याच्या काबरीचा शोध चालू आहे.
मंगोलियाच्या खेन्ती प्रांतातल्या ओनाॅन नदीकाठी, रस्ता बनवण्याच्या कामी तैनात कामगारांनी कामाच्या ओघात त्या ठिकाणी असलेली मोठी शिळा हलवली आणि एकच गोंधळ उडाला. त्या शिळेखाली त्यांना मानवी सांगाडे सापडल्यानंतर ती एक दफनभूमी असल्याचे लक्षात आले. महत्त्वाची बाब म्हणजे तिचे महत्त्व ओळखून फोरेन्सिक तज्ञ आणि बिजींग विद्यापीठातील पुरातत्त्ववेत्ते यांना पाचारण करण्यात आले.
तज्ञांना त्या दफनभूमीत एकूण 68 मानवी सांगाडे सापडले, त्यातील 16 सांगाडे स्त्रियांचे होते. सोबत घोड्यांचेही सांगाडे आणि हजारो सोन्याचांदीची नाणी सापडली. विविध निरिक्षणे आणि परिक्षण केल्यानंतर एक उंच व्यक्तीचा सांगाडा वय वर्षे साधारण 70-75 आणि मृत्यूचा काळ सुमारे इ.स. 1225 ते 1235 मोंगल सम्राट चेंगिझ खानाचा असल्याचे सिद्ध झाले. चेंगिझ खानासोबर त्याच्या राण्या, दास-दासी, घोडे आणि भरपूर संपत्तीचेही दफन करण्यात आले होते. दफनभूमी सुरक्षित रहावी म्हणून त्यावर काम करणा-या कारागिरांनाही मारून शेवटी तिथेच पुरले असल्याचे पुरातत्त्वविदांचे मत आहे.
चीनपासून युरोपापर्यंतच्या साम्राज्याचा सम्राट चेंगिझ खान याची पुरातन कबर त्यातील संपत्तीसह सापडणं ही एक ऐतिहासिक उपलब्धीच मानली पाहिजे. चेंगिझ खानाच्या कबरीच्या माध्यमातून इतिहासातील अणखी काही कोडी सुटण्यात किती यश येतेय, ते आता काळ सांगेलच.




