रॉक्ससने या अन्यायाविरुध्द आवाज उठवला. तो कोर्टात गेला आणि जज पियो मार्कोसला त्याने या धाडीचा अर्थ विचारला. हा आदेश थेट राष्ट्राध्यक्ष फर्डीनांड मार्कोस यांनी दिल्याने आपण हे वॉरंट जारी केल्याचे जज पियो मार्कोसने कबूल केले. जास्त उठाठेव केली तर जीवाला धोका आहे असेही त्याला यावेळी सांगण्यात आले. रॉक्ससने लगेच अज्ञातवासात जाण्याचा निर्णय घेतला आणि तो दिसेनासा झाला. २९ एप्रिलला लष्करी अधिकाऱ्याने जप्त केलेली बुध्दाची मूर्ती कोर्टाच्या हवाली केल्याचे वृत्त समजल्यावर तो पुन्हा उगवला. मूर्ती बघितल्यावर त्याच्या लक्षात आले की कोर्टात जमा केलेली मूर्ती नकली प्रतिकृती आहे.
रॉक्ससला या दरम्यान काही माणसं भेटायला आली. कोर्टात जमा केलेली मूर्ती खरी आहे असे निवेदन करण्यासाठी रॉक्ससला त्यांनी ५,००,००० डॉलर देऊ केले. रॉक्ससने असे काही करण्यास नकार दिला आणि तो पुन्हा नाहीसा झाला. महिन्याभरात लष्कराने त्याला हुडकून काढले आणि तुरुंगात डांबले. लष्करी अधिकाऱ्यांनी रॉक्ससचा छळ केला. त्याला रबरी दंडूक्यानी मारहाण केली. अंगावर सिगारेटचे चटके दिले.
हे सगळे घडत असताना फिलीपिनी जनतेला या प्रकरणाचा सुगावा लागला होता. जनतेत चर्चेला उधाण आले होते. लष्कराने घरावर टाकलेली धाड शांतातापूर्ण होती असे निवेदन रॉक्ससकडून लिहून घेण्यात आले. लष्कर हे विसरले होते की रॉक्ससचा मूळ व्यवसाय डुप्लिकेट चावी बनवण्याचा आहे. एक दिवस तुरुंगाचे कुलूप तोडून रॉक्सस पुन्हा पळाला. यानंतर १९७२ साली पुन्हा त्याची धरपकड करून तुरुंगात टाकण्यात आले. १९७४ साली त्याची सुटका करण्यात आली. यानंतर १२ वर्षं रॉक्ससअज्ञातवासात गेला.