गूगल नेहमीच वेगवेगळ्या दिवसाचं औचित्य साधून डूडल तयार करत असतं. प्रसिद्ध शोध, शास्त्रज्ञ व्यक्ती, कलाकार, घटना या विविध विषयांवर डुडल असतात. गुगलने काल आपल्या डूडलच्या माध्यमातून भारतीय वैज्ञानिक प्रोफेसर उडुपी रामचंद्र राव यांचे स्मरण केले आहे. प्रोफेसर राव यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त गुगलने हे खास डूडल बनवले आहे.
प्रोफेसर राव यांचा जन्म १० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. अत्यंत साध्या अश्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्राध्यापक राव यांच्या नेतृत्वात भारताने आर्यभटासह २० हून अधिक उपग्रह तयार करून अंतराळात यशस्वीपणे सोडले. भारतातच नव्हे तर सम्पूर्ण जगात प्राध्यापक राव यांचे नाव खूप आदरपूर्वक घेतले जाते.






