टोयोडा नावातून टोयोटा कंपनीचा जन्म कसा झाला? या नावामागे काय इतिहास आहे?

लिस्टिकल
टोयोडा नावातून टोयोटा कंपनीचा जन्म कसा झाला? या नावामागे काय इतिहास आहे?

टोयोटा या जपानी कंपनीच्या गाड्या भारतात येऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. एकेकाळी टोयोटाची गाडी विकत घेणे फक्त अतिश्रीमंत लोकांनाच शक्य होते. महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांच्या पांढर्‍या टोयोटाची एकेकाळी बरीच चर्चा असायची. पण आज आम्ही लिहित आहोत टोयोटा या नावाबद्दल.

आता यात सांगण्यासारखं काय आहे? जपानी गाडी आहे म्हणजे ते कोणा व्यक्तीचं नाव असणार, किंवा जपानमधल्या शहराचं नाव असणार किंवा असंच काही जपानी कनेक्शन असणार. आपल्याकडेही असंच असतं. किर्लोस्कर कंपनीच्या पंपाला किर्लोस्कर पंप म्हणतात. अगदी बरोबर आहे, टोयोटाचं पण असंच आहे.

१९३७ साली टोयोटा मोटर कार्पोरेशनची स्थापना किचीरो टोयोडा यांनी केली. परंतु प्रत्यक्षात कंपनीच्या मालकाचं नाव Toyota नसून Toyoda आहे. आता हा गोंधळ झाला कसा? टोयोडाचं टोयोटा कसं झालं? त्याचं झालं असं की 'डा' पेक्षा 'टा' चा उच्चार लोकांना आवडला म्हणून टोयोटा म्हणायला सुरुवात केली. पण याहूनही महत्वाचे कारण असे होते जपानी भाषेत टोयोटा नाव लिहिताना ८ अक्षरात लिहिले जाते. ८ हा आकडा जपानमध्ये अत्यंत 'लकी' समजला जातो. ८ चा आकडा वर्षानुवर्षं प्रगती आणि सातत्य दाखवतो. म्हणून 'टोयोडा'च्या ऐवजी 'टोयोटा' हेच नाव कायम करण्यात आले.

आता थोडी आणखी माहिती जाणून घेऊया. साकीची टोयोडा म्हणजे किचीरो टोयोडा यांच्याबद्दल. साकीची टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण 'पॉवर लूम' म्हणतो. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. केवळ यासाठीच साकीची टोयोडा ओळखले जातात असे नाही. त्यांनी औद्योगिक क्षेत्राला नव्या पध्दतीने विचार करायला शिकवले. त्यांची 'Five whys' ही संकल्पना आजही उद्योग जगतात 'लिन मॅनेजमेंट'चा महत्वाचा भाग समजली जाते.

(किचीरो टोयोडा)

चला तर जाता जाता हे 'Five whys' काय आहे तेपण समजून घेऊया!

एखाद्या समस्येचे मूळ कारण शोधणे या ही संकल्पना वापरली जाते. उदाहरणार्थ: गाडी बंद पडली आहे, सुरु होत नाही.

Why? क्र.१ – बॅटरी संपली आहे.
Why?क्र.२ –कारण आल्टरनेटर बंद पडला आहे.
Why?क्र. ३– आल्टरनेटरचा पट्टा तुटला आहे.
Why?क्र.४ - पट्टा टिकण्याची मुदत संपली होती आणि तरीही तो तसाच वापरात होता.
Why? क्र.५ गाडीची ठरलेल्या वेळापत्रकानुसार देखभाल केलेली नाही.

पाचव्या 'व्हाय' समस्येचे मूळ कारण दाखवले.

वाचकहो, टोयोटा म्हणा की टोयोडा म्हणा, आता जेव्हा एखादी समस्या तुमच्यासमोर उभी राहील तेव्हा ही 'Five whys' संकल्पना नक्की वापरून बघा!

टॅग्स:

marathiBobhata

संबंधित लेख