सरकारी ‘मारुती’ची उड्डाणे!
गुडगावची ‘ती’ फॅक्टरी केव्हाच बंद पडून तिथं रान माजलं होतं. सुझुकी कंपनीचे मालक ओसामू सुझुकी यांनी पाऊल ठेवलं तेव्हा तिथं माकडांनी उच्छाद मांडला होता. इथं सुरू करणार आहोत कंपनी? सुझुकी हबकलेच. मग सोबत असलेल्या आर. सी. भार्गवांनी त्यांना दिलासा दिला. ‘मारुती हा वानरांचाही देव असल्यामुळं इथं माकडं आहेत. जातील ती...’
ही जागा होती मारुती उद्योग लिमिटेडची. पूर्वीच्या ‘मारुती मोटर्स कंपनी’ची आणि आजच्या ‘मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड’ची. या कंपनीनं गुडगावचाच नव्हे, भारतातल्या मोटरवाहन उद्योगाचा चेहरामोहरा बदलला. देशातल्या कार बाजारातला अर्धा हिस्सा एकट्या या कंपनीचा आहे. राजकारण, प्रशासन, अर्थकारण, खासगीकरण अशी अनेक निसरडी वळणं शिताफीनं पार करत; इंजिनचं पाणी जोखणार्या चढांचा मान राखत, गरजेनुसार गिअर बदलत ‘मारुती’नं आगेकूच केली.











