आज कोविडमुळे अख्खी दुनिया भरडून निघालेली असताना ज्याच्या त्याच्या तोंडी व्हॅक्सिनचा विषय आहे. नित्य व्यवहार कधी सुरळीत सुरू होणार? लॉकडाऊनची टांगती तलवार कधी दूर होणार? हे सगळ्यांसाठी कळीचे प्रश्न आहेत. बहुतेक संशोधकांच्या मते किमान ७० ते ७५ टक्के लोकांचं व्हॅक्सिनेशन पूर्ण झाल्यावरच या साथीला काही प्रमाणात आळा बसू शकेल आणि त्यासाठी अजून काही वेळ जावा लागेल. पण अशा प्रकारे जगाला वेठीला धरणारा कोविड हा काही पहिलाच रोग नाही. जगाच्या इतिहासात याहून भयंकर अशा रोगांच्या साथी येऊन गेल्या आहेत. डांग्या खोकला किंवा व्हूपिंग कफ हा असाच एक रोग.
डांग्या खोकल्याला आजार म्हणून ओळख मिळाली ती मध्ययुगापासून. हा आजार प्रामुख्याने नवजात अर्भकं व लहान मुलांमध्ये दिसतो. क्वचित प्रसंगी तरुण आणि मोठ्या माणसांमध्ये आढळतो. सुरुवातीला त्याची लक्षणं बरीचशी सर्दीसारखी असली तरीही नंतर धाप लागून खोकल्याची उबळ येते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुलांमध्ये ह्या आजारामुळे असणारा मृत्युदर १० % एवढा जास्त होता.






