आपल्याकडे जागतिक पर्यावरण दिन आला की मोठ्या प्रमाणात पर्यावरणवाद्यांचे किंवा निसर्गमित्रांचे लेख छापले जातात किंवा बातम्यांमध्ये दाखवले जातात. माणूस कसा निसर्गाचा ऱ्हास करतोय हे वाचून त्यादिवशी आपण वाचून हळहळ व्यक्त करतो आणि नंतर विसरून जातो. मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा? तर स्वतःचा स्वार्थ पाहण्याची व फायदा करून घेण्याची त्याच्याकडे असलेली उपजत बुद्धीमत्ता.
आता हेच बघा, अंटार्क्टिक महाद्वीप शोधून काढायची बुद्धी ही माणसाचीच आणि नंतर त्या सुंदर महाद्वीपाचा ऱ्हास करण्याची बुद्धी ही त्याचीच. २०० वर्षांपूर्वी, १७ नोव्हेंबर १८२० रोजी कनेक्टिकट जहाजाचा कॅप्टन नथॅनियल पामरने अंटार्क्टिक महाद्वीप शोधून काढला. त्यानंतरच्या दोन दशकांत तिथे अनेक प्रकारे प्रगती झाली. व्यावसायिक,शास्त्रीय संशोधन झाले. तिथल्या नैसर्गिक स्रोताचे संवर्धन न करता त्यांना वापरून आर्थिक फायदा कसा होईल यासाठी अनेक देशांत चढाओढ सुरू झाली. त्यासाठी प्रगत देश आपापला हक्क सांगू लागले. आजच्या लेखात आपण मानवाने पर्यावरणाचा कसा ऱ्हास केला याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.












