"चांगल्या कामात बिब्बा घालणे" हा वाक्यप्रचार अनेक वेळेस आपण ऐकलेला असतो. अनेक कामांना अडवणारा हा बिब्बा नक्की असतो तरी काय?
बिब्ब्याचं झाड देशात बहुतांश सर्वत्र आढळतं. Semecarpus anacardium अर्थात बिब्बा [Family: Anacardiaceae ] नावाचं हे झाड आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी उपयोगी पडतं. आपण मात्र या उपयोगांबद्दल अगदी अनभिज्ञ असतो. आंबा आणि काजूच्या कुटुंबातल्या ह्या सदस्याला भल्लात:, भेला, भिलवा, भिलामु, केरु अशा विविध नावांनी ओळखलं जातं. बिब्याच्या या अनाकार्डियम सेमेकार्पस या वनस्पती शास्त्रीय नावात खूप मजेशीर अर्थ दडलाय. सेमेकार्पस म्हणजे खुणा करण्यासाठी योग्य फ़ळ आणि अनाकार्डियम म्हणजे ज्याचा आकार हृदयाकृती आहे. म्हणजेच खुणा करण्यासाठी वापरता येऊ शकतं असं हृदयाकृती फळ असलेला वृक्ष तो हा बिब्बा.








