करोना संशोधनासाठी देहदान करणारी 'पहिली भारतीय महिला'...

लिस्टिकल
करोना संशोधनासाठी देहदान करणारी 'पहिली भारतीय महिला'...

कोरोना काळात माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे हे वारंवार जाणवत आहे. कोरोना योद्धे तर करत असलेले बहुमूल्य योगदान कोणीही विसरु शकत नाही. पण यात सामान्य माणूस मग तो कुठल्याही वयाचा असो तोही मागे राहिला नाही. भारतात सध्या रक्तदानासाठी, प्लाझ्मा दानासाठी अनेकजण पुढे येत आहेत. पण याच काळात कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी देहदान करून पाहिली भारतीय महिला ठरलेल्या ज्योत्स्ना बोस यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? 

कोलकाता येथील ९३वर्षांच्या कामगार चळवळ नेत्या ज्योत्स्ना बोस यांनी कोरोनाच्या अभ्यासासाठी देहदान केले आहे. असे करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. मानवावर कोरोनव्हायरसचे कसे परिणाम होतात यावरील संशोधनासाठी त्यांचे शरीर उपयोगी येणार आहे. 

Gandarpan या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, पश्चिम बंगालमधील संस्थापक ब्रोजो रॉय हे भारतातले पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांच्या शरीरावर पॅथॉलॉजिकल शवविच्छेदन केले गेले होते. त्यांचा कोविड -१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ज्योत्स्ना बोस यांनीही देहदान केले. असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. नेत्रतज्ज्ञ डॉ. विश्वजित चक्रवर्ती यांचे शरीर याच हेतूसाठी दान केले गेले आहे.

(ब्रोजो रॉय)

बोस यांची नात डॉ. टिस्टा बसू यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी रॉय यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या आजीने देहदानाची ईच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी कागदपत्रही तयार करून ठेवली होते. १४ मे रोजी ज्योत्स्ना बोस यांना उत्तर कोलकाता भागातल्या बेलियाघाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी RG Kar मेडिकल कॉलेज व रुग्णालयात बोस आजींचे पॅथॉलॉजिकल शवविच्छेदन करण्यात आले. अशाप्रकारे कोविड संसर्गाच्या मृत्यूनंतर पॅथॉलॉजिकल शवविच्छेदन करण्यात आलेल्या त्या देशातील पहिली महिला ठरल्या. 

ज्योत्स्ना बोस यांचा जन्म १९२७ मध्ये सध्याच्या बांगलादेशातील चटगांव येथे झाला होता. दुसर्‍या महायुद्धात बोस यांचे वडील बर्माहून परत येत असताना बेपत्ता झाले. मग या कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट कोसळले. बोस यांना त्यांचे शिक्षणही अर्धवट सोडवे लागले. नंतर त्यांनी ब्रिटीश टेलिफोनमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरी केली. काही दिवसांनी ज्योत्स्ना बोस कामगार संघटनेच्या चळवळीत सामील झाल्या. त्यांनी १९४६ मध्ये नौदल विद्रोहच्या समर्थनार्थ पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाने केलेल्या संपामध्ये भाग घेतला होता. नंतरच्या आयुष्यात त्यांनी कामगार चळवळीचे कट्टर नेते मोनी गोपाल बासुशी लग्न केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला झोकून दिले. 

आयुष्यभर सामाजिक कार्य केलेल्या ज्योत्स्ना बोस यांनी मृत्यूनंतरही देहदान करून खूप मोठे योगदान दिले आहे. कोरोनाव्हायरसबद्दल आज जेवढी माहिती उपलब्ध आहे ती त्रोटक आहे, त्यावर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संपूर्ण अवयवांवर कोरोनामुली होणारा परिणाम समजून घेण्यासाठी पॅथॉलॉजिकल शवविच्छेदन खूप महत्वाचे ठरेल. 

 

लेखिका: शीतल दरंदळे

टॅग्स:

Bobhata

संबंधित लेख