आपल्याकडे कर्ज घेतलं की त्यावर व्याज भरावं लागतं हे शाळकरी मुलांना कळतं. आपल्या शाळेत अंकगणितात नेहमी "समजा दरसाल दर शेकडा १० टक्के दराने कर्ज घेतले तर ....." अशी गणितं आपण सोडवतोच, नाही का? या समजाला तिरका छेद नेणारी एक घटना या आठवड्यात डेन्मार्कमध्ये घडली आहे. डेन्मार्कमधल्या जॅस्क बँकेने चक्क निगेटीव्ह दराने कर्ज द्यायला सुरुवात केली आहे. हे ' निगेटीव्ह रेट ऑफ इंटरेस्ट' म्हणजे काय हे समजणं थोडं कठीण आहे, पण 'बोभाटा' तुम्हाला ते शक्य तितकं सोप्या शब्दात सांगणार आहे. त्यासाठी बँक कर्जाचे व्यवहार कसे करते ते आधी समजून घेऊ या!!
कर्ज घेण्यासाठी बँक चक्क व्याज देत आहे? कोणत्या देशात घडतंय हे ?


थोडक्यात कमी व्याजाने पैसे घेऊन तेच पैसे जास्त व्याजाने फिरवणे हा बँकेचा धंदा असतो. बँक हे पैसे विकत घेणारे आणि पैसे विकणारे दुकान आहे असं समजा. आपण बचत खात्यात पैसे भरले की महिन्याच्या शेवटी जी जमाराशी असेल त्यावर बँक ३.५ ते ४.० टक्के व्याज देते. म्हणजेच ३.५ ते ४.० टक्के दराने तुमचे पैसे बँक भाड्याने घेते. याखेरीज फिक्स्ड डिपॉझीटमध्ये जेव्हा आपण पैसे ठेवतो, तेव्हा ते पैसे दीर्घ मुदतीने बँकेला वापरता येतात. साहजिकच त्या डिपॉझीटवर जास्त व्याज (६.५ ते ७.५ %) म्हणजे तुमच्या पैशांचे बँक जास्त भाडे देते. अशा पध्दतीने जमा झालेले पैसे बँक कर्ज घेणार्याला देते, तेव्हा बँकेला ९.५ ते १४.५ टक्के व्याज मिळते.
आता सहसा होत नाही, पण समजा असं झालं की एखाद्या बॅकेकडे १००० कोटी जमा झालेत आणि कर्जाचे वाटप फक्त ५०० कोटींचेच झालेय?
तर वाटप झालेल्या पैशावर बॅकेला नफा मिळेल, पण वाटप न झालेल्या पैशावरचे व्याज बँकेच्या अंगावर पडेल.

आता समजा, बँकेकडे १००० कोटी जमा झालेत पण ते फिरलेच नाहीत, म्हणजे कर्ज घ्यायला कोणी आलंच नाही तर?
तर काय? हे तर बँक बुडण्याचे चिन्ह आहे!! १००० कोटींवर व्याज द्यायचे आहे, बँक चालवायची आहे, पण बँकेला उत्पन्नाचे साधनच नाही. रोज बँकेचे नुकसान वाढतच जाईल .
आता तुम्ही म्हणाल असं होणं शक्यच नाही. अगदी खरं आहे. कर्जाची मागणी नेहेमीच वाढत असते. भारतासारख्या देशात तर असं काही होणं शक्यच नाही. भारतात काय, युरोप आणि अमेरीकेत पण हे शक्य नाही. पण या जगात काही समृध्द देश आहेत जिथे बँकेत जमा होणारा निधी वापरलाच जात नाही.

असं कुठे असतंय का?
हो, स्कँडेनेव्हीयन कंट्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये अशीच अवस्था आहे. नॉर्वे-फिनलंड-स्वीडन -डेन्मार्क या देशात कर्जाचा दर ज्याला बँकिंग परीभाषेत प्राइम लेंडींग रेट म्हणतात, तो फक्त ०.२५ % ते २.० % आहे. या देशात कर्जाला मागणीच नाही असेही म्हणता येईल इतका मुबलक पैसा या देशात जनतेच्या हातात खुळखुळतो आहे. याला अपवाद फक्त आईसलँड या देशाचा आहे.
कर्जाला मागणी नसणे म्हणजे बॅकेवरचे संकटच नाही का?
अर्थातच. यावर तोडगा म्हणजे वेगवेगळी प्रलोभनं किंवा आकर्षक योजना आखून लोकांना कर्ज घ्यायला प्रवृत्त करणं. डेन्मार्कमध्ये सध्या असेच काहीसे घडते आहे.

म्हणजे नक्की काय घडतंय?
डेन्मार्क जॅस्क या बँकेने जाहीर केलंय की या, कर्ज घ्या, व्याज देऊच नका, तुम्ही कर्ज घेताय म्हणून आम्हीच तुम्हाला व्याज देतो. आता बोला ! याचा सोपा अर्थ असा की कर्ज घेण्यासाठी बँक तुम्हाला व्याज द्यायला तयार आहे. अशा व्याजाला म्हणतात " निगेटीव्ह रेट ऑफ इंटरेस्ट".
हा व्यवहार होतो तरी कसा?
सर्वसाधारणपणे गृहकर्जासारख्या दीर्घ मुदतीच्या कर्जावर असे निगेटीव्ह व्याज दिले जाते. जॅस्क बँक सध्या दहा वर्षाच्या मुदतीच्या गृहकर्जावर आता -०.२५ % हे निगेटीव्ह व्याज देणार आहे. पण त्यासाठी हे व्याज आपल्या हातात न देता दरवर्षी तुम्ही कर्जाचा हप्ता भरल्यानंतर शिल्ल्क असलेल्या कर्जावर ०.२५% सूट दिली जाणार आहे. १० वर्षांचे गृहकर्ज परत देण्यासाठी हप्ता मोठा असेल हे सहाजिकच आहे. पण समजा वीस वर्षांसाठी कर्ज घेतलेत, तर ०.००% व्याजावर पण बँक कर्ज द्यायला तयार आहे.

पण हे असे का?
लक्षात घ्या, कोणत्याही देशात जेव्हा पैसा फिरतो तेव्हाच आर्थिक प्रगती होते. उदाहरण गृहकर्जाचेच घेऊ या! घरासाठी कर्ज घेतले की तेच पैसे सिमेंट, लाकूड, रंग, लोखंड या क्षेत्रात फिरतील. ते फिरले की रोजगारात तेच पैसे वापरले जातील, रोजगारातलेच पैसे ग्राहक उपयोगी क्षेत्रात येतील. म्हणजे पैसा फिरला तर उद्योग चालतील. नाहीतर हळूहळू व्यापार बंद होईल.
असे किती कर्ज जॅस्क बँक देते आहे?
सध्या २,५०.००० डेनीश क्रोन म्हणजेच २५ लाख रुपये कर्ज देते आहे. पण या बँकेव्यतिरिक्त डेन्मार्कमधली नॉर्डिया नावाची बँक पण अशा प्रकारचे कर्ज देतेय.

पण बँक पगार कसे देणार?
अर्थातच लोन प्रोसेसींग फी आकारून!!!
आणखी कोणकोणत्या देशात असा निगेटिव्ह इंटरेस्ट रेट आहे?
स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जपान आणि स्वीडन या देशांमध्ये कर्जाचा दर हा शून्याच्या खाली आहे.

तर अशी स्थिती आहे जगातल्या काही देशांत!! आपल्यासारख्या देशात दरवर्षी शेकडो शेतकरी कर्जाच्या भारामुळे आत्महत्या करतात. भारतात असे देशात असे दिवस कधी येणार, हाच प्रश्न तुमच्या मनात आला असेल याची आम्हाला खात्री आहे. कारण हाच प्रश्न आमच्याही मनात आला होता .
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१