अनेक लेखक किंवा कवी जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो तेव्हाच लोकांना माहिती होतात. भारतात असे अनेक साहित्यिक आहेत ज्यांच्याविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. काहीवेळा तर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतील लेखक फारसे परिचयाचे नसतात. पण ह्या लेखकांची ओळख असणं महत्त्वाचं आहे. आज आम्ही अशाच एका कवीला घेऊन आलो आहोत. कोसली भाषेत अप्रतिम कविता करणारे श्रेष्ठ कवी हलधर नाग यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार घेऊया.
फक्त तिसरीपर्यंत शिकलेल्या या कवीच्या कवितेवर लोक पीएचडी करत आहेत?


हलधर नाग यांचा जन्म १९५० सालचा. ओडिशातलं बारगढ हे त्यांचं गाव. त्यांचं कुटुंब अगदी गरीब होतं. परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे जीवन संघर्ष रोजचीच बाब होती. पण म्हणून ते दुःख उगाळत बसले नाहीत. लहानपणीच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले. त्यावेळी ते फक्त तिसऱ्या वर्गात होते. परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी एका मिठाईच्या दुकानात भांडी घासण्याचं काम सुरू केले. काही दिवस गेले आणि गावातल्या सरपंचाने त्यांना एका शाळेत नेले. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक ते करायचे. जवळजवळ सोळा वर्ष त्यांनी हे काम केले.
शेवटी त्यांनी ते काम सोडले. त्यानंतर अनेक प्रयत्न करून त्यांनीं बँकेतून हजार रुपयांचं कर्ज घेतले आणि एक स्टेशनरी दुकान सुरू केले. शाळेतली मुलं मधल्या सुटीत काही छोट्या-मोठ्या वस्तू घेऊन जायची. छोट्या छोट्या कविता ते करायचे. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी लिहिलेली कविता स्थानिक मासिकात छापून आली. त्यांच्या कवितेचे खूप कौतुक झाले. त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळाले आणि त्यांचा कवितांचा प्रवास सुरु झाला. त्यांना कविता ऐकवायला खूप आवडायच्या.

आज वयाची ७० पार केलेल्या हलधर नाग यांनी कोसली भाषेत शेकडो कविता लिहिल्या आहेत. २० महाकाव्य लिहिली आहेत. विशेष म्हणजे या सर्व कविता आणि ही २० महाकाव्ये त्यांना तोंडपाठ आहेत. गावागावांत जाऊन ते आपल्या कविता लोकांना ऐकवतात. गावकऱ्यांना त्यांच्या कविता इतक्या आवडल्या, की त्यांनी हलधर यांना 'लोककवी' ही उपाधी दिली आहे. केवळ तिसरी शिकलेल्या या कवीच्या कवितांवर अनेकांनी पीएचडी प्रबंध लिहिले आहेत. त्यांच्या कवितांचं पुस्तक विद्यापीठात अभ्यासक्रमाला आहे. आजपर्यंत अनेक विद्यापीठात त्यांचं काव्यवाचन झाले आहे. त्यांच्या साहित्याचा समावेश संबळपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे.

कोसली भाषेत लिहीणाऱ्या या कवीला २०१६ मध्ये सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. फक्त धोतर आणि बंडी या साध्या वेशात अनवाणी ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला गेले होते. पुरस्काराबरोबर मिळालेल्या रकमेचा वापर त्यांनी समाजोपयोगी कार्यासाठी केला. ते म्हणतात, 'मला त्या रकमेची आवश्यकता नाही, माझ्यापुरते मी कमावू शकतो.' अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या या महान लोककवीला बोभाटाचा मानाचा मुजरा.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१