पेशवीण गोपिकाबाईंचा असा झाला अहंकारामुळे दुर्दैवी अंत!!

लिस्टिकल
पेशवीण गोपिकाबाईंचा असा झाला अहंकारामुळे दुर्दैवी अंत!!

(प्रातिनिधिक फोटो - स्रोत)

कलर्स मराठीवर ' स्वामिनी' ही मालिका जर तुम्ही बघीतली असेल तर 'गोपीकाबाई' म्हणजे कोण हे सांगायला नकोच! गोपिकाबाईंच्या चतुर, हट्टी, निग्रही, धोरणी आणि स्वतःच्या मर्जीसाठी दुसर्‍याचा वापर करणार्‍या स्वभावाचे  चित्रण या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळते.पेशवाईतल्या रमा-माधवाचे प्रेम ते नारायणराव पेशव्यांचा खून इतका ऐतिहासिक कालखंड अनेक दु:खांतिकांनी भरलेला आहे. उभ्या आयुष्यात चार पेशव्यांचा मृत्यू सहन करण्याचे चटके गोपीकाबाईंनी खाल्ले, पण त्यांच्या अहंकारी स्वभावाने त्यांची मरणापर्यंत साथ सोडली नाही. आजच्या लेखात आपण गोपीकाबाईंच्या अहंकाराचा प्रवास वाचणार आहोत. 

गोपीकाबाईंचे लग्न नानासाहेब पेशव्यांशी झाले तेव्हा त्या फक्त ५ वर्षांच्या होत्या. अतिकर्मठ आणि परंपरानिष्ठ संस्कारात वाढलेल्या गोपिकाबाई हुशार होत्या, तशाच करारी आणि हट्टीसुद्धा होत्या. ज्या काळात स्त्रियांच्या मतांना दरबारी  राजकारणात प्रवेश नव्हता त्या काळात  नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" म्हणजे गोपिकाबाई!शनिवारवाड्यावर चालणार्‍या अंतर्गत राजकारणात आणि छुप्या गृहकलहात गोपीकाबाईंची नेहेमीच सरशी झाली. पण हेच राजकारण त्यांच्या दु:खालाही कारणीभूत झाले.

(नानासाहेब पेशवे)

नानासाहेबांनी त्यांचे थोरले चिरंजीव विश्वासराव यांचा विवाह सरदार गुप्ते यांची कन्या राधिकाबाईंसोबत निश्चित केला. हा विवाह व्हावा ही छत्रपतींचीही इच्छा होती. मात्र हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता. अर्थात ज्याला अनेक कारणं होती. महत्वाचे कारण असे की पेशवे चित्पावन बाह्मण होते तर गुप्ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते. कधी जातीचे कारण देऊन, तर कधी जन्मपत्रिका जुळत नसण्याचे कारण पुढे करून साखरपुडा झाल्यावरही लग्न पुढे ढकलण्यात गोपीकाबाई यशस्वी झाल्या.

(विश्वासराव)

याच दरम्यान छत्रपती शाहूंचे निधन झाल्याने लग्न पुढे ढकलत नेण्याचा मनसुबा यशस्वी झाला. पण राधिकेवर प्रेम जडलेल्या विश्वासरावांनी लग्नाचा हट्ट धरून ठेवल्यावर शेवटची चाल गोपिकाबाई खेळल्या. उत्तरेस होणारे अब्दालीचे आक्रमण थांबवण्यासाठी हिंदवी स्वराज्याची शपथ घालून विश्वासरावांना त्यांनी रवाना केले.  राधिकेचे दुर्दैव असे की पानपतात विश्वासराव त्यात मारले गेले आणि लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली.  पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतित केले. 

गोपिकाबाईने 'राधिका'ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. दुर्दैवाचा भाग असा की, राधिकेबद्दल करुणा न बाळगता उलट हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाई सुद्धा काही कमी दुर्दैवी नव्हत्या. त्यांना त्यांच्या हयातीतच आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले.असे म्हंटले जाते की या अतीव दुःखाने गोपिका बाई या भ्रमिष्ट झाल्या होत्या. 

माधवरावांशी झालेल्या वादामुळे त्या शनिवारवाडा सोडून, नाशिकजवळ गंगापूर येथे जाऊन राहिल्या. नारायणरावांच्या खुनानंतर गोपिकाबाईंनी पुणे कायमचेच सोडले. त्या परत शनिवार वाड्यात आल्या नाहीत आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. तिथेही त्यांचा स्वभाव बदलला नव्हता. सनातन विचारांचा प्रखर पगडा असलेल्या गोपिकाबाई फक्त आणि फक्त उच्चपदस्थ सरदारांच्या आई, पत्नी आणि मुलींकडूनच भिक्षा घ्यायच्या. नोकरांकडून मिळालेली भिक्षा त्या चक्क नाकारायच्या. तिथेही त्यांच्या अंगातील जुना पीळ गेला नव्हता.

(माधवराव)

एकदा भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीला पाहून संतापाने किंचाळू लागल्या. ती स्त्री नेमकी होती, सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते. पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिका बाईंनी पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा उद्रेक राधिकेवर काढला.

आजूबाजूच्या सरदार दरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात पोचते केले. आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा वयाच्या ६३व्या वर्षी, ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला.

(नारायणराव)

ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यांनी मृत्युला जवळ केले, त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू'वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले. राधिकाबाईंनी गोदावरीच्या तीरावर त्यांच्या नावे एक दीपमाळ उभारली. परंतु, १९६१ च्या पुरात ही दीपमाळ वाहून गेली आणि गोपिका बाईंची कहाणी पण !

(गोदावरी)

आज ही अनेक लोक आपल्या नातलगांसाठी तिथे तेलाचा दिवा लावतात. करारी आणि जिद्दी स्त्री म्हणूनच गोपिकाबाईंचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे खरं, पण कदाचित अतिकर्मठ आणि परंपरानिष्ठ संस्कारात वाढलेल्या गोपिका बाई अशा बनल्या नसतील कशावरून? सत्याने त्यांच्याबरोबरच दम सोडलाय, पण अहंकार शेवटी आपलाच नाश करतो हेही तेवढंच खरं हे मान्य करावे लागेलच!

 

लेखिका : गोपी

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख