मृत्यू अटळ असला तरी तो येण्याचा क्षण मात्र ठाऊक नसतो, म्हणून माणूस मृत्यूला सतत घाबरत असतो. मृत्यूचं जे जे दृश्यरूप आहे ते टाळू लागतो. ते रूप समोर आलं की पळ काढतो, गांगरतो, बेचैन होतो,अतीव दुःखाने धाय मोकलून रडतो, प्रेत यात्रा दिसली की रस्ता बदलून घेतो. थोडक्यात काय, माणूस मृत्यू अशुभ मानतो. मृतावस्थेतला जिवंतपणा टिपण्याच्या वृत्तीचा अभाव मृत्यूला टोकाचं रखरखीत करून सोडतो. पण या जगाच्या पाठीवरच्या एका बाईने मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवत त्या गोठल्या-थिजल्या क्षणातलं जिवंतपण आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
नाव आहे ग्रॅसीएला इटर्बाइड (Graciela Iturbide), मुक्काम पोस्ट मेक्सिको. वय वर्ष ७८! गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ हि गोरी आजी आपल्या लेन्समधून जगाला माणसाचं डोकं चक्रावेल अशा अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी दाखवतेय. तिच्या मातृभाषेतून तिने टिपलेल्या लेन्सकथां विषयी भरभरून बोलतेय. ती माणसांच्या वेगवेगळ्या गटांत जाऊन राहते. त्यांच्यातली होते. त्यांच्याविषयी भरभरून बोलते. त्यांना सन्मानपूर्वक जगासमोर आणते. त्यातलाच एक भाग म्हणजे तिने जगासमोर आणलेला मृत्यूचा चेहरा. हा चेहरा उदास, भकास, नकारात्मक नाही, तर तो स्वीकाराचा चेहरा आहे. काळाच्या या टाईमलाईनवर विचार केला तर मृत्यूच्या हाहा:कारानं वेशीपासून घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळ्यांना हतबल केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅसीएला इटर्बाइड यांनी आपल्या फोटोंच्या माध्यमातून जगासमोर जीवन - मृत्यूच्या फेऱ्याचं, संस्कृतीच्या खुणांचं केलेलं फोटो डॉक्युमेंटेशन महत्वाचं ठरतं.
















