(प्रातिनिधिक फोटो)
हजारो वर्षांची समृध्द संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात दर दहा कोसांवर जुन्या इतिहासाचे अवशेष बघायला मिळतात. काही ठिकाणं ऐतिहासिक वारशाच्या निमित्ताने 'टूरिस्ट अॅट्रॅक्शन' या सदरात मोडतात. साहजिकच सुट्टीत फिरायला जायचं म्हटलं की तयार होणाऱ्या याद्यांमध्ये त्यांची नावं येतात. पण अशीही काही गावं अशी आहेत की ज्यांचं नाव या खास यादीत येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातलं बुर्हाणपूर (किंवा बर्हानपूर असंही म्हणतात).
एकेकाळी या शहराला दक्षिणेकडे नेणारा दरवाजा असंही म्हटलं जायचं. मोगलांच्या खानदेश सल्तनतीचा भाग असलेल्या या शहराचं महत्व एकेकाळी इतकं वाढलं होतं की मोगलांचा आग्रा दरबार एकेकाळी या शहरात हलवला गेला होता. १६०१ साली अकबराने खानदेश जिंकल्यावर या शहराचं महत्व वाढतच गेलं. व्यापार वाढत गेला. मुळात हा भाग धनधान्याने श्रीमंत होताच. त्यात मोगल साम्राज्याची दक्षिणेकडील राजधानी म्हणावं असं महत्व या शहराला मिळालं.










