गेल्या वर्षी येऊन गेलेली असुर नावाची वेब सिरीज तुम्ही पाहिली का? या सिरीजमध्ये एक सिरियल किलर काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना मारून टाकत असतो. हा गुन्हेगार कोण आहे? तो लोकांना का मारतो आहे? याचा काहीच पुरावा मिळत नसतो. मग होतं काय, तर आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सुविधा वापरून सदर गुन्हेगाराचा शोध घेतला जातो व त्याला शिक्षा होते.
जगभरात रोज कितीतरी गुन्हे घडत असतात. पण वर म्हटल्याप्रमाणे काही वेळेला असंही होतं की गुन्हेगाराचा काहीच पत्ता लागत नसतो. पण आज अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब्सचा वापर करून गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तरीपण गुन्हेगार शोधायला बराच वेळ जातो आणि कष्टही बरेच करावे लागतात. मग तर विचार करा मागच्या ६० ते ७० वर्षांपूर्वी ही परिस्थिती कशी असेल. समजा एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला आणि तो करणाऱ्या गुन्हेगाराचा काहीच ठावठिकाणा नाहीये, तो एकापाठोपाठ एक गुन्हे करतोय अशा वेळेला तेव्हा काय होत असेल?















