रॉयल एनफील्ड थंडरबर्ड सारख्या बाईक कोणी जाळेल का? पण एका माणसानं हे कामही केलं. याला कारणही तसंच होतं. वाचा हा डोक्याला शॉट देणारा किस्सा !!
झालं असं की, सावंतवाडीच्या अन्वर राजगुरू नावाच्या व्यक्तीने २००९ साली नवी कोरी रॉयल एनफील्ड थंडरबर्ड विकत घेतली होती. पण बाईक घेताना खोटं आयडी कार्ड दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. कोर्टात केस उभी राहिली. केस दरम्यान कोर्टाने त्याची बाईक जप्त केली. तब्बल ७ वर्ष कोर्टाचे हेलपाटे मारल्यानंतर कोर्टाचा निकाल लागला आणि त्याला त्याची बाईक परत मिळाली.
राव, कोर्टाने बाईक परत दिली पण सहजासहजी नाही. त्याला आधी ५ वर्षांची विमा पॉलिसी आणि आरटीओची पेनल्टी भरावी लागली. या सर्वांचा राग अन्वरच्या मनात खदखदत होता. शिवाय ७ वर्ष केसमुळे झालेला मनस्ताप त्याला अस्वस्थ करत होता. यासर्वांचा परिणाम होऊन त्याने रागाच्या भरात कोर्टाच्या समोरच बाईकला आग लावली.
मंडळी, कोर्टाच्या ढिम्म कारभाराचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो हे याचं हे नवीन उदाहरण.




