पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे दुचाकी किंवा चार चाकी गाड्या वापरणे आता अनेकांच्या आवाक्याबाहेरची बाब बनली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतक्यात तरी कमी होतील अशी काही चिन्हे नाहीत. त्यामुळे लोकांनी आपापल्या परीने या समस्येवर तोडगा काढायचा असे ठरवले आहे. आता पुन्हा काही जण सायकलीच्या वापराकडे वळत आहेत. सायकलीमुळे इंधन बचत होते, पैसा वाचतो हे खरं असलं तरी सायकल कमी वेळेत जास्त अंतर पार करू शकत नाही. त्यामुळे यात एकतर अधिक वेळ जातो शिवाय, चढणीचा रस्ता असेल तर सायकल चढवण्यासाठी खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते. सायकल चालवण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत.
इंधन बचत होईल, पैसेही वाचतील आणि जास्त वेळही जाऊ नये असा काही तरी पर्याय शोधण्यासाठी राजकुमार मुप्पारापू याने प्रयत्न सुरू केले. कारण जिथे महिन्याकाठी त्याचा एकूण खर्च ३००० रुपये होत होता तिथे या इंधन दरवाढीमुळे त्याचे दरमहा पाच हजार रुपये खर्च होऊ लागले. हा वाढीव खर्च त्याला झेपणारा नव्हता. त्यामुळे त्याचे बजेटच कोलमडून जाऊ लागले.








