१७ वर्षांच्या कष्टातून ३०० एकरमध्ये नवीन जंगल निर्माण करणारा अवलिया !!

लिस्टिकल
१७ वर्षांच्या कष्टातून ३०० एकरमध्ये नवीन जंगल निर्माण करणारा अवलिया !!

BMC ने आरे कॉलनीतील २७०० झाडांना तोडण्याची परवानगी दिल्याची बातमी तुम्ही आज वाचलीच असेल. गेल्याच आठवड्यात अमेझॉनच्या आगीने थैमान घातलं होतं. दिवसेंदिवस अशा प्रकारे वन्य भाग कमी होत जात आहे आणि जागतिक तापमान वाढीची गती दिवसेदिवस वाढत आहे. हे डोळ्यांसमोर दिसत असूनही आपण काही करत नाहीय, पण काही लोक आहेत ज्यांनी फेसबुक, ट्विटर, वर चिंताजनक पोस्ट न टाकता खऱ्या कामाला सुरुवात केली आहे.

आम्ही मणिपूरच्या मोईरंगथेम लोईया या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. त्याने ३०० एकर जागेत जंगल निर्माण केलं आहे. कौतुक म्हणजे हे काम त्याने एकट्याने केलंय. यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्याच खर्ची घातलं आहे. तो गेल्या १७ वर्षापासून झाडे लावण्याचं काम करतोय.

या जंगलाचं नाव आहे पुंशीलोक. तिथे २५० प्रकारची झाडे आहेत, तर २५ प्रकारचे बांबू आहेत. याखेरीज पक्षी आणि प्राण्यांच्या बऱ्याच जाती या जंगलात आढळतात.

मोईरंगथेम २००० साली कॉलेज संपल्यानंतर मणिपूरचं कौब्रू शिखर बघायला गेला होता. हा भाग पूर्वी झाडांनी बहरलेला होता, पण २००० सालापर्यंत वृक्षतोडीमुळे ती जागा उजाड झाली होती. हे बघून मोईरंगथेमला धक्का बसला. काही तरी केलं पाहिजे ही त्याची पहिली भावना होती. यानंतर मोईरंगथेमने वृक्षलागवडीची जमीन शोधायला सुरुवात केली.

स्थानिकांच्या मदतीने त्याला मारू लंग्लोल पर्वतरांगांचा पत्ता लागला. मोईरंगथेम तिथे पोहोचला तेव्हा तिथली झाडं देखील भाताच्या शेतीसाठी नष्ट करण्यात आली होती. तिथे एकही झाड नव्हतं. मोईरंगथेमसाठी ही जागा योग्य होती. 

त्याने आपल्या कामाचा राजीनामा दिला. पुढची ६ वर्ष त्याने कष्टाने अनेक वृक्षांची लागवड केली. मणिपूरच्या सरकारनेही त्याला मदतीचा हात दिला. सरकारतर्फे तिथल्या अवैध बांधकामांना पाडण्यात आलं. आता तिथे हिरवीगार वृक्षराजी आहे.

पुढच्या काळात मोईरंगथेमला त्याचे मित्र येऊन मिळाले. त्यांनी Wildlife and Habitat Protection Society ची स्थापना केली. या संस्थेतर्फे जंगलाची निगा राखली जाते.

मोईरंगथेम सध्या फार्मासिस्ट म्हणून काम करतोय. शिवाय तो सेंद्रिय शेती करतो. त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याला आणखी झाडे लावायची आहेत. तो स्वतःला चित्रकार म्हणवतो. तो एका मुलाखतीत म्हणाला, की “इतर लोक कॅनव्हास वापरतात, पण मी या टेकड्यांना कॅनव्हास म्हणून वापरतो.”

मंडळी, या अवलियाच्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन असेच नवीन चित्रकार निर्माण होतील हीच अपेक्षा आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख