लोकांनी त्याला मृत्यूचा सौदागर म्हटलं म्हणून त्याने नोबेल पुरस्कारांना सुरु केले ?? नक्की काय होता हा किस्सा?

लोकांनी त्याला मृत्यूचा सौदागर म्हटलं म्हणून त्याने नोबेल पुरस्कारांना सुरु केले ?? नक्की काय होता हा किस्सा?

जगातील अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार. यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांना आजपासून सुरुवात झाली असून 2023 चे पहिले मानकरी ठरवले जातील. त्याआधी जाणून घेऊया जगातील सर्वात महत्वाच्या पुरस्काराची प्रेरणा आली तरी कुठून ?

नोबेल पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार आहे शांतता पुरस्कार. शांततेसाठी झटणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पण नोबेल पुरस्कारांना जन्म देणाऱ्या ‘आल्फ्रेड नोबेल’ यांनी त्यांच्या आयुष्यात जे महत्वाचे शोध लावले ते अशांतता पसरवणारे होते. आता उदाहरणच घ्या ना, डायनामाईटचा शोध आल्फ्रेड नोबेल यांनीच लावला. यासोबत अनेक स्फोटकांच्या शोधाचं श्रेय त्यांनाच जातं. त्यांच्या हयातीत त्यांच्यावर माणसांच्या हत्येचा नवीन मार्ग शोधल्याबद्दल अनेक आरोप झाले. एका घटनेने मात्र त्यांना त्याच्यावरचा हा आरोप पुसण्याचा नवीन मार्ग सापडला.

आल्फ्रेड नोबेल (स्रोत)

१८८८ साली आल्फ्रेड नोबेल यांचे बंधू 'लुड्विंग नोबेल' यांचा मृत्यू झाला. फ्रेंच वृत्तपत्रांनी चुकून लुड्विंग यांच्या जागी अल्फ्रेड यांच्याच मृत्यूची बातमी छापली. या बातम्यांमध्ये लिहिलं होतं, “मृत्यूच्या व्यापाऱ्याचा मृत्यू”, “जास्तीत जास्त लोकांना कमीतकमी वेळेत मारण्याचं साधन तयार करून श्रीमंत झालेल्या शास्त्रज्ञाचा काल मृत्यू झाला.” या बातम्यांनी आल्फ्रेड नोबेल विचारात पडले, ‘मृत्युनंतर आपण कशाप्रकारे ओळखले जाऊ ?’ नोबेल पुरस्कार सुरु करण्यात या घटनेला मोठं श्रेय जातं.

लुड्विंग नोबेल (स्रोत)

त्यांनी लगेचच आपल्या मृत्यूपत्रात बदल करून घेतले. आपल्या मृत्युनंतर आपल्या संपत्तीच्या रकमेतून मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात यावेत असं त्यांनी लिहून ठेवलं. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्युनंतर (१८९६) ४ वर्षांनी म्हणजे १९०१ पासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान, औषधे, साहित्य आणि शांतता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आल्फ्रेड नोबेल यांच्या ९४% संपत्तीचा वापर करून पुरस्कार तयार केले गेले. 

लुड्विंग यांच्या मृत्यूपूर्वी आणखी एका मृत्यूने त्यांच्यावर परिणाम केला होता. एमिल नावाचा त्यांचा भाऊ स्फोटकांच्या अपघाताला बळी पडला. या अपघातातून धडा घेऊन त्यांनी सुरक्षित स्फोटके निर्माण करण्यासाठी संशोधन सुरु केलं. यातूनच डायनामाईटचा जन्म झाला. डायनामाईटचं पूर्वीचं नाव होतं ‘नोबेल सेफ्टी पावडर’. आपली प्रतिमा ‘स्फोटक तयार करणारा’ होऊ नये म्हणूनच त्यांनी अशी तजवीज केली होती. पण शेवटी काही कारणांनी हे नाव बदलून ‘डायनामाईट’ (म्हणजे शक्ती/सामर्थ्य) नाव ठरलं. डायनामाईटमुळे त्यांना प्रसिद्धी सोबत लोकांचा रोष पत्करावा लागला. शेवटी या प्रतिमेला पुसण्याचे काम नोबेल पुरस्काराने केलं.

डायनामाईट (स्रोत)

आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या कार्यकाळात स्फोटके तयार करून अनेकांना मारण्याचं साधन बनवलं हे खरंच, पण त्यांनी सुरु केलेल्या पुरस्काराने जगभरातल्या लोकांना काम करण्याची नवी उर्जा दिली हे विसरून चालणार नाही.

टॅग्स:

marathi newsbobhata newsbobhata marathimarathi infotainmentBobhatamarathi

संबंधित लेख