प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!
प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!
त्या काळात अमेरिकन सरकार भयगंडाने पछाडलेले होते. जगातले दोन साम्यवादी देश रशिया आणि चीन आपल्याला वरचढ होणार या कल्पनेने सरकार अस्वस्थ झालेले होते. त्यांना जळीस्थळीकाष्ठीपाषाणी कम्युनिस्ट दिसायला लागले होते. मॅकार्थीझमने अमेरीकेला झपाटले होते. जोसेफ मॅकार्थी या सिनेटरच्या नावाने ओळखल्या जाणार्या या चळवळीने जनतेला भारावून टाकले होते. कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून नागरीकांना कामावरून काढून टाकणे, खोटे आरोप लावून तुरुंगात डांबणे, ब्लॅकलिस्ट करणे असे बरेच काही घडत होते.
सीआयएच्या उच्च पातळीवर पण रशियन गुप्तहेर पोहचले आहेत असाही संशय बर्याच जणांना होता. यात किती सत्यता होती ते पुढे खूप वर्षांनंतर उघडकीस आले. पण या संशय आणि भीतीच्या वातावरणाचा पूर्ण फायदा अॅलन डलेस आणि त्याच्यासोबत काम करणार्या भुताळीला मिळाला. या भुताळीत सामील असलेला एक महासंमंध असं ज्याला म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे सिडनी गॉटलीब!!
पूर्वसूत्र :
अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्याच भागात आम्ही सादर करणार आहोत, कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.
हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली. पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.











