म्हैसूरच्या एका व्यक्तीने चक्क वाघ दत्तक घेतलाय राव. या बातमीने म्हैसूर परिसरात त्याचीच चर्चा होत आहे. या बातमीने त्याचं कौतुक तर होतंय, पण त्याला लोक सेलिब्रिटी समजू लागलेत. चला तर या माणसाची ओळख करून घेऊया.
महेंद्र सिंग कलाप्पा असं या व्यक्तीचं नाव आहे. महेंद्र व्यवसायाने फायनान्सर आहे. पण त्याला सामाजिक कार्य आवडतं. झाडं लावणं, स्वच्छता अभियान राबवणं यासारखे उप्रक्रम किंवा गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणं इत्यादी कामातून त्याचं प्राणीप्रेम आणि निसर्गप्रेम दिसून येतं.

जागतिक व्याघ्र दिनाच्या (International Tiger Day) निमित्ताने म्हैसूर प्राणी संग्रहालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महेंद्रने वाघ दत्तक घेतला. हा वाघ त्याने आपल्या आईवडिलांच्या नावे दत्तक घेतलाय. वर्षाला १ लाख रुपये देणगी देऊन या वाघाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे.
Mahendra Singh Kalappa, who adopted a tiger from Mysuru Zoo during #InternationalTigerDay, becomes celebrity overnight at his native Bannur town.#Karnataka pic.twitter.com/U7df7iMklz
— APN NEWS (@apnnewsindia) July 31, 2018
ही बातमी टीव्हीवर प्रसारित होताच महेंद्र लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या कामाचं सगळीकडून कौतुक झालं.
पुण्याच्या अक्षय पूर्णपात्रेंनी ‘सोनाली’ नावाची सिंहिण पाळली होती, नंतर त्यांना तिला प्राणिसंग्रहालयात सोडावं लागलं होतं. पण हा वाघ महेंद्रच्या घरात न राहता प्राणिसंग्रहालयातच राहणार आहे. या वाघाच्या सांभाळासाठी लागणारा सर्व खर्च महेंद्र देणार आहे.
मंडळी, पुढे जाऊन आपल्याला डायनोसॉरसारख्या वाघांच्या कथा सांगायच्या नसतील तर आज महेंद्रसारख्या लोकांची गरज आहे.




