मंडळी, मुंबईतल्या पामबीच मार्गाला लागून असलेली एनआरआय कॉम्प्लेक्स जवळचे तलाव आणि पाणथळ जागा तशी दरवर्षी इथे येणाऱ्या विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांंमुळे आणि इथे आढळणाऱ्या जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहेत. इथं मानवी हस्तक्षेप कमी आहे. त्यामुळे गुजरातमधून इथे स्थलांतरित झालेले हजारो फ्लेमिंगो पक्षी इथं येऊन वास्तव्य करतात. त्यामुळे ही जागा गुलाबी रंगाने रंगून जाते. पण सद्या इथल्या तळ्यातल्या पाण्याचा रंगही अचानक गुलाबी झालाय! 'हिंदुस्तान टाइम्सचे' पत्रकार प्रतिक चोरगे यांनी या गुलाबी पाणथळीचे फोटो टिपलेत.
'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या मते मुंबई परिसरात अशा प्रकारचं दुर्मिळ दृश्य पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे त्यांनी या गुलाबी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यायचं ठरवलंय. पण इथल्या एका स्थानिक महिलेने मात्र या खाडीत अशाच प्रकारचं गुलाबी पाणी २०१६ मध्येही आपण पाहिलं असल्याचं सांगितलं. हे गुलाबी पाणी एखादं रसायन मिसळल्यासारखं वाटत होतं.






