केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने आता देशात आता नव्या शैक्षणिक धोरणाला (New Education Policy) मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं (HRD) नावही बलदण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय (Ministry Of Education) असं म्हटलं जाणार आहे. १९९२ नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या (MSBSHSE SSC Result) दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result 2020) लागला त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल (New National Education Policy 2020) करण्याचे घोषित केले आहे. यापुढे दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा नसेल किंवा फारशी महत्त्वाची नसेल, असंच या शिक्षण सुधारणा धोरणातून स्पष्ट होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.









