साल २०१०. त्या आजोबांचं नाव होतं अल्बर्ट फ्लिक. वय ६८-६९च्या जवळपास. १९७९ साली त्यांनी बायकोची हत्या करून अर्धं आयुष्य तुरुंगात घालवलं होतं. यावेळी त्यांनी एका महिलेवर हल्ला केला होता. पीडितेच्या वकिलांनी त्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून मागणी केली, पण कोर्टाने निर्णय देताना म्हटलं की, "अल्बर्ट फ्लिक हे फार वृद्ध झाले आहेत. त्यांना केवळ ४ वर्षांचा तुरुंगवास पुरेसा आहे. ४ वर्षांनी ते बाहेर पडतील तेव्हा त्यांची सत्तरी उलटलेली असेल, त्यामुळे ते धोकादायक ठरणार नाहीत."
जज साहेबांचं लॉजिक पटण्यासारखं होतं. एवढा म्हातारा माणूस कोणाला काय त्रास देणार? आजोबा तुरुंगात गेले आणि ४ वर्षं राहून आले. ८ वर्षांनी म्हणजे २०१८-१९ साली आजोबांना पुन्हा पोलिसांनी पकडलं. यावेळी त्यांनी एका महिलेला तिच्या मुलांसमोर चाकू भोसकून ठार केलं होतं.







