आजही कार घेणं हे अनेकांचं स्वप्न आहे. कार घेण्यासाठी कमीतकमी ६ लाख (हा आकडा कमी जास्त असू शकतो) तरी खिशात असावेच लागतात. हे एवढ्यावरच भागत नाही राव. यासोबत आणखीही काही गोष्टी असतात. तुम्हाला उदाहरणच देऊन सांगतो. कार ट्रेड वेबसाईटवर मारुती सुझुकी स्विफ्टची ठाण्याच्या शोरूम मधली किंमत ४,९९,००० आहे. या किमतीला RTO आणि इन्शुरन्सचे पैसे जोडले की ही किंमत तब्बल ५,७६,६२३ पर्यंत वाढते. एकंदरीत काय, तर कार सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नाही.
आज जसं कार अनेकांचं स्वप्न आहे, तसंच ते आजपासून ९० ते १०० वर्षांपूर्वीही होतं. त्याकाळातील कारच्या किंवा मोटारसायकल्सच्या किमती बघितल्या की तुमच्या लक्षात येईल एवढ्या कमी किमतीत तर मी चारपाच गाड्या घेतल्या असत्या. पण गंमत अशी आहे की आजच्या काळात अगदी क्षुल्लक वाटणारे पैसे जमवणंही त्याकाळात आजच्याकाळातील लाखभर पैसे जमवण्याइतकं कठीण काम होतं.
चला तर, आज थोडं मागे जाऊया आणि कार आणि मोटारसायकल्सच्या जुन्या किंमती पाहूया. त्याकाळातल्या किंमती पाहून तुम्हांला नक्कीच धक्का बसेल.












